दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी; विद्यापीठ स्तरावर टास्क फोर्स
आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा पुढाकार; महाविद्यालयांनी मदतीसाठी पुढे येण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती घोषित केलेल्या भागातील कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे थांबू नये, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती घोषित केलेल्या २६५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सवलत देण्यासोबतच त्यांना आवश्यक इतर मदत मिळवून देण्यासाठी प्रत्येक विद्यापीठ स्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव तसेच महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ऑनलाइन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते.
प्रथम सत्राच्या परीक्षांचे शुल्क आकारू नये
मदत व पुनर्वसन विभागाने राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने परीक्षा शुल्क माफीबाबत परिपत्रक जारी केले आहे.
त्यानुसार नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या प्रथम सत्राच्या परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा – दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; खरीप पीक कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन
‘फक्त शासन निर्णयाची अंमलबजावणी करून थांबू नका’
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करताना केवळ शासन निर्णयाची अंमलबजावणी करून थांबू नये, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. अतिवृष्टीच्या काळात राबविण्यात आलेल्या मेंटॉर-मेंटी योजनेप्रमाणे उच्च शिक्षण क्षेत्राने यावेळीही पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
ज्या महाविद्यालयांकडे अधिक सुविधा उपलब्ध आहेत, त्यांनी दुष्काळाची तीव्रता अधिक असलेल्या भागातील महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्यावा. उच्च शिक्षण क्षेत्राने या परिस्थितीकडे केवळ औपचारिकता म्हणून न पाहता एक कुटुंब म्हणून एकत्रितपणे विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात, असेही पाटील यांनी सांगितले.
विद्यापीठांमध्ये टास्क फोर्स
या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक विद्यापीठात टास्क फोर्स स्थापन करून त्याअंतर्गत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी मदतकार्य सुरू करावे, असेही सांगण्यात आले.
विद्यापीठे आणि महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा दर १५ दिवसांनी आढावा घेण्यात यावा, असे निर्देशही चंद्रकांत पाटील यांनी दिले. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा आर्थिक परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ नये, यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर समन्वित मदतव्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.





