निफाडच्या दुष्काळी परिस्थितीची फेरपडताळणी; छगन भुजबळांचे प्रशासनाला कडक निर्देश
पर्जन्यमान, पावसाचा खंड आणि पीक नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश; येवला-निफाडमध्ये पीक कापणी प्रयोग प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना

येवला : शासनाने जाहीर केलेल्या ट्रिगर-१ दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत निफाडचा समावेश नसल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पर्जन्यमान, पावसाचा खंड, पिकांची प्रत्यक्ष स्थिती आणि उत्पादनातील संभाव्य घट याची तातडीने फेरपडताळणी करावी. त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करावा, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले.
येवला मतदारसंघातील पीक परिस्थिती आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येवला येथील संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत भुजबळ बोलत होते. महसूल, कृषी, जलसंपदा, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, महावितरण आदी विभागांकडून त्यांनी सद्यस्थितीचा आढावा घेतला.
निफाडमधील चार मंडळांची विशेष पाहणी
निफाड तालुक्यातील देवगाव, विंचूर, लासलगाव आणि नांदूरमध्यमेश्वर या मंडळांमध्ये पावसाचा खंड आणि त्याचा पिकांवर झालेला परिणाम याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले. पर्जन्यमानाची नोंद, पावसातील खंड, पीक नुकसान आणि उत्पादनातील घट याबाबत अचूक आकडेवारी संकलित करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
येवला आणि निफाड तालुक्यातील पिकांच्या प्रत्यक्ष उत्पादनाचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी पीक कापणी प्रयोग निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. प्रयोगासाठी प्लॉटची निवड करताना विशेष दक्षता घेऊन सिंचनाची सुविधा किंवा पाटचाऱ्यालगतची जमीन निवडली जाणार नाही, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले. पावसाचा सर्वाधिक खंड पडलेल्या भागांमध्ये आवश्यकतेनुसार अतिरिक्त पडताळणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
हेही वाचा – नांदेडच्या शेतकऱ्यांना अतुल सावे यांचा दिलासा; ‘शासन खंबीरपणे पाठीशी, सर्वतोपरी मदत करू’
पात्र शेतकऱ्यांना मदतीचा लाभ देण्याचे निर्देश
खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर लागू झालेल्या येवला तालुक्यात शासनाच्या निर्देशानुसार विविध सवलती आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास भुजबळ यांनी सांगितले. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज बिलात नियमानुसार सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आणि रोजगार हमी योजनेतील निकषांमध्ये शिथिलता यांचा पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळेल, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
पीक नुकसानीचे पंचनामे, ई-पीक पाहणी, पीक विमा दावे आणि शासकीय मदतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी महसूल आणि कृषी विभागाने समन्वयाने काम करावे, असे भुजबळ यांनी सांगितले.
पाणी, चारा आणि रब्बीचेही नियोजन
येवला आणि निफाड तालुक्यातील धरणे, तलाव, बंधारे, विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. संभाव्य पाणीटंचाईची गावे आतापासून निश्चित करून आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले.
पशुधनासाठी उपलब्ध चारा आणि पाण्याची स्थिती तपासून चारा डेपो व अन्य उपाययोजनांचे आगाऊ नियोजन करावे, तसेच पशुवैद्यकीय सेवा आणि लसीकरण प्रभावीपणे राबवावे, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करावे. गहू, हरभरा, कांदा आणि कमी पाणी लागणाऱ्या पिकांसाठी बियाणे, खते व अन्य निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाण्याची उपलब्धता, लागवड क्षेत्र, साठवणूक व्यवस्था आणि बाजारपेठेच्या परिस्थितीचाही आढावा घेण्यास सांगण्यात आले.
रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रोजगाराची मागणी करणाऱ्या पात्र कुटुंबांना वेळेत रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. पुढील तीन महिन्यांचा स्वतंत्र कृती आराखडा तयार करून जलसंधारण, मृदसंधारण आणि पाणी साठवण क्षमता वाढविणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे, असे भुजबळ यांनी सांगितले.
दरम्यान, कोटमगाव येथील ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या जगदंबा देवी नवरात्रोत्सवासाठी तसेच १३ ऑक्टोबर रोजी येवला येथे होणाऱ्या मुक्तीदिन कार्यक्रमासाठी वाहतूक, पाणी, आरोग्य, स्वच्छता, वीज आणि सुरक्षेचे पूर्वनियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या दिवशी समस्या निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आगाऊ नियोजन आणि विभागीय समन्वयाला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.




