ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक प्रक्रियेला महाराष्ट्रातून कायदेशीर आव्हान; कोल्हापूर खंडपीठात याचिका
14 निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांवर आक्षेप; महाराष्ट्रातील SIR थांबवणे, वगळलेली मतदारांची नावे पुनर्स्थापित करण्याची मागणी

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या काही निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांना आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदारयादी पुनरिक्षण अर्थात SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेसह मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे आणि मतदार यादीच्या डिजिटल व्यवस्थेशी संबंधित मुद्दे या याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत.
प्रथमेश गोपाल गवाणकर, गौरव सूर्यकांत नाखरेकर, आदेश शशिकांत भाटकर आणि स्मिताली निलेश नार्वेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. असीम सरोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे वकिलांचे पथक काम पाहत आहे. याचिकेत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार तसेच निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांच्यासह संबंधित पक्षकारांना प्रतिवादी करण्यात आल्याचे वृत्त आहे.
याचिकेत नेमके कोणते मुद्दे?
याचिकेत निवडणूक आयोगाच्या काही निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत :
- 14 निर्णयांवर आक्षेप असल्याचा दावा :
दोन निवडणूक आयुक्तांनी मागील काही महिन्यांत आयोगाच्या निर्णय, आदेश आणि प्रक्रियांबाबत किमान 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती द इंडियन एक्स्प्रेसच्या तपासणी अहवालातही प्रसिद्ध झाली आहे.
- मतदार यादी आणि डिजिटल प्रणाली :
नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे किंवा पुनर्स्थापित करणे, मतदार यादीच्या डेटाबेसचा प्रवेश, Electoral Registration Officers (ERO) यांच्या कार्यपद्धती तसेच ERONet आणि ECINet यांसारख्या डिजिटल प्रणालींशी संबंधित प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
हेही वाचा – महाराष्ट्रात विद्यार्थी निवडणुकांची पुन्हा चाहूल; 12 सदस्यीय समिती स्थापन
- आयोगाचे निर्णय सामूहिक पद्धतीने झाले का?
मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्त यांच्या सामूहिक निर्णय प्रक्रियेबाबतही याचिकेत कायदेशीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 2023 च्या संबंधित कायद्यानुसार आयोगातील कामकाज आणि निर्णयप्रक्रियेबाबत कोणती पद्धत अवलंबण्यात आली, यावरही याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
- महाराष्ट्रातील SIR थांबवण्याची मागणी :
महाराष्ट्रात सुरू असलेली SIR प्रक्रिया थांबवावी आणि या प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून वगळण्यात आलेली पात्र मतदारांची नावे पुनर्स्थापित करावीत, अशी मागणी याचिकेत करण्यात आल्याचे वृत्त आहे.
- स्वतंत्र चौकशीची मागणी :
मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र न्यायिक समिती स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगातील कथित मतभेदांची चर्चा
या याचिकेची पार्श्वभूमी निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी नोंदवलेल्या आक्षेपांच्या वृत्ताशी जोडली जात आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या 23 सप्टेंबरच्या अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मागील दहा महिन्यांत आयोगाच्या काही निर्णय आणि प्रक्रियांवर किमान 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवले. मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे, मतदार डेटाबेसचा प्रवेश आणि SIRशी संबंधित प्रक्रियांवर हे आक्षेप असल्याचे अहवालात नमूद आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने या वृत्ताला उत्तर देताना दोन आयुक्तांच्या नोंदींचे अस्तित्व किंवा त्यातील मजकूर नाकारलेला नाही; मात्र त्यांना निर्णय प्रक्रियेतील ‘सूचना’ म्हणून संबोधत, मागील वर्षातील आयोगाचे निर्णय एकमताने झाल्याचे म्हटले आहे.
यामुळे आयोगातील निर्णयप्रक्रिया, मतदार यादीतील बदल आणि SIRच्या अंमलबजावणीवरून कायदेशीर तसेच राजकीय पातळीवर चर्चा सुरू आहे. आता कोल्हापूर खंडपीठातील याचिकेवर न्यायालयीन पातळीवर पुढील काय घडते, याकडे लक्ष लागले आहे.




