Asian Games 2026: कमलजीत-सुरुचीची सुवर्ण कमाल; भारताला शूटिंगमध्ये पहिलं गोल्ड
10 मीटर एअर पिस्तूल मिक्स्ड टीममध्ये 484.6 गुणांसह सुवर्णपदक; दक्षिण कोरियावर 6.6 गुणांची आघाडी

नागोया : 2026 एशियन गेम्समध्ये भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे. 10 मीटर एअर पिस्तूल मिक्स्ड टीम प्रकारात कमलजीत सिंह आणि सुरुची सिंह या भारतीय जोडीने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. हे या स्पर्धेतील भारताचे दुसरे सुवर्णपदक असून, नेमबाजीतील भारताचे पहिले गोल्ड ठरले आहे.
भारतीय जोडीने अंतिम फेरीत 484.6 गुण मिळवत आशियाई विक्रम नोंदवला. दक्षिण कोरियाच्या जोडीने 478.0 गुणांसह रौप्य, तर इराणने 415.8 गुणांसह कांस्यपदक मिळवले. भारताने दक्षिण कोरियावर अखेर 6.6 गुणांची आघाडी राखली.
सुरुवातीपासून भारताची आघाडी
अंतिम फेरीच्या पहिल्या सीरिजमध्ये भारताने दक्षिण कोरियावर 4.9 गुणांची आघाडी घेतली. दुसऱ्या सीरिजमध्ये कोरियन जोडीने जोरदार पुनरागमन करत ही आघाडी 1.2 गुणांपर्यंत कमी केली. मात्र कमलजीत आणि सुरुची यांनी संयम कायम ठेवत पुन्हा आघाडी वाढवली.
एका टप्प्यावर भारताची आघाडी 7.2 गुणांपर्यंत पोहोचली होती. शेवटच्या क्षणी दक्षिण कोरियाने दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जोडीने आपली आघाडी कायम ठेवली.
सुरुचीने अखेरच्या दोन शॉट्समध्ये अनुक्रमे 10.5 आणि 10.8, तर कमलजीतने निर्णायक टप्प्यावर 9.5 गुणांची नोंद केली. अखेर भारताने 484.6 गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले.
पात्रता फेरीतही भारत अव्वल
कमलजीत आणि सुरुची यांनी अंतिम फेरीपूर्वी पात्रता फेरीतही अव्वल स्थान मिळवले होते. भारतीय जोडीने 587 गुण मिळवत आशियाई विक्रमाची बरोबरी केली. इराणने 584, दक्षिण कोरियाने 582 आणि इंडोनेशियाने 580 गुण मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
या सुवर्णपदकामुळे भारताची एशियन गेम्समधील एकूण पदकसंख्या 19 झाली आहे. भारताच्या खात्यात सध्या 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य पदके आहेत. यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाने भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते.





