फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पीक नुकसानीची पाहणी, भरपाईची ग्वाही
म्हसला, मोहगव्हाण आणि जऊळका येथे सोयाबीन-तुरीच्या नुकसानीची पाहणी; ‘शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन सोबत’

वाशिम : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक-पाणी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. कमी पर्जन्यमानामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन आणि तूर पिकांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार करत लवकरात लवकर आवश्यक मदत दिली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
पश्चिम विदर्भातील, म्हणजेच अमरावती विभागातील पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अमरावती येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी वाशिम जिल्ह्यातील म्हसला (ता. कारंजा) येथील शेतकरी देविदास किशन काळे यांच्या शेताला भेट दिली. येथे नुकसानग्रस्त सोयाबीन आणि तूर पिकांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यानंतर मोहगव्हाण (ता. मंगरुळपीर) येथे शेतकरी अनिल भगरे तसेच अब्दुल नईम शेख रहीम यांच्या शेतातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली. कमी पर्जन्यमानामुळे सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना धीर देत, “शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. शासन शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांना जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. यासंबंधीची अधिसूचनाही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल,” असे सांगितले.
हेही वाचा – औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड नको; राज्यात महिनाभर विशेष तपासणी मोहीम
जऊळका येथेही नुकसानीची पाहणी
मुख्यमंत्र्यांनी जऊळका (ता. मालेगाव) येथील शेतकरी संतोष सखाराम डुंबळे यांच्या शेताच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संतोष डुंबळे यांच्या आई शकुंतलाबाई यांनीही दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
फडणवीस यांनी परिसरातील पीक-पाणी परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. अत्यल्प पर्जन्यमानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याच्या घोषणेचा त्यांनी पुन्हा एकदा उल्लेख केला. झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन शासनाकडून आवश्यक मदत प्राधान्याने आणि लवकरात लवकर देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पाणी आणि चाऱ्याचे नियोजन
आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येईल. तसेच जनावरांसाठी चारा उपलब्धतेबाबतही दक्षता घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शासनाची मदत थेट मिळण्यासाठी लवकरच कार्यवाही सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या दौऱ्यात खासदार संजय देशमुख, खासदार अनुप धोत्रे, आमदार बाबुसिंग महाराज, आमदार सई डहाके, आमदार श्याम खोडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार भावना गवळी, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.





