Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रीती झिंटाच्या ‘Team Tukaram Mundhe’ टी-शर्टवर मुंढे स्पष्टच बोलले; ‘फक्त नाव लावून चालणार नाही’

मल्लिका शेरावतच्या कौतुकावरही FDA आयुक्तांची प्रतिक्रिया; ‘अन्नसुरक्षेसाठी केवळ एका व्यक्तीचे नाही, टीमचे काम गरजेचे’

मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अन्नभेसळ आणि अन्नसुरक्षेविरोधातील कारवाईची सध्या चर्चा होत आहे. त्यांच्या मोहिमेला अभिनेत्री प्रीती झिंटा आणि मल्लिका शेरावत यांनीही सोशल मीडिया आणि सार्वजनिक माध्यमातून पाठिंबा दर्शवला. आता या सेलिब्रिटींच्या कौतुकावर तुकाराम मुंढे यांनी प्रतिक्रिया दिली असून, केवळ सोशल मीडिया पोस्ट किंवा समर्थनाचे प्रतीकात्मक प्रदर्शन न करता प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रीती झिंटा अलीकडेच ‘Team Tukaram Mundhe’ असा मजकूर असलेला काळा टी-शर्ट परिधान करून मुंबईत दिसली होती. तिच्या या कृतीची माध्यमांमध्ये चर्चा झाली. याबाबत प्रतिक्रिया देताना मुंढे यांनी सांगितले की, त्यांचे प्रीती झिंटाशी वैयक्तिकरित्या किंवा फोनवर बोलणे झालेले नाही. मात्र, तिने ‘Team Tukaram Mundhe’चा उल्लेख केल्याबद्दल त्यांनी तिचे आभार मानले.

मुंढे यांनी यावेळी केवळ टी-शर्ट घालणे किंवा सोशल मीडियावर कौतुक करणे पुरेसे नसल्याचे सांगितले. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रत्यक्ष काम आणि योग्य मानसिकता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्नसुरक्षेसारख्या विषयांवर विविध क्षेत्रांतील नागरिकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पीक नुकसानीची पाहणी, भरपाईची ग्वाही

मल्लिका शेरावतच्या व्हिडिओवरही भाष्य

अभिनेत्री मल्लिका शेरावतने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तुकाराम मुंढे यांच्या अन्नसुरक्षेसाठीच्या कामाचे कौतुक केले होते. इडली-चटणी खातानाचा व्हिडिओ शेअर करत तिने हिंदी-मराठी मिश्र भाषेत मुंढे यांचे आभार मानले होते. तिच्या या व्हिडिओचीही सोशल मीडियावर चर्चा झाली.

मल्लिका शेरावतच्या समर्थनावर प्रतिक्रिया देताना मुंढे यांनी सांगितले की, ते आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र अन्नसुरक्षेचे काम हे केवळ एका व्यक्तीचे नसून संपूर्ण टीमच्या प्रयत्नांचे फलित आहे. नागरिकांनीही भेसळयुक्त, असुरक्षित किंवा आरोग्यास घातक अन्नपदार्थांबाबत सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

सेलिब्रिटींच्या पाठिंब्यापेक्षा प्रत्यक्ष सहभागावर भर

मुंढे यांच्या अन्नसुरक्षा मोहिमेला इतर काही सेलिब्रिटींकडूनही सार्वजनिक पाठिंबा मिळाला आहे. मात्र, या पाठिंब्याचे स्वागत करताना मुंढे यांनी नागरिक आणि सार्वजनिक व्यक्तींनी केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित न राहता अन्नसुरक्षेबाबत जागरूकता आणि प्रत्यक्ष कृतीत सहभागी होण्यावर भर दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button