औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड नको; राज्यात महिनाभर विशेष तपासणी मोहीम
‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’चा प्रभावी वापर करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचे निर्देश; आठ परिमंडळांमध्ये यादृच्छिक नमुना तपासणी

मुंबई : राज्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देताना औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये, असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील आरोग्य संस्थांना पुरवठा होणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’ या उपकरणाचा प्रभावी वापर करावा. तसेच, औषध गुणवत्ता तपासणीसाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा (SOP) अवलंब करून नियमित तपासणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य भवन येथे औषधांच्या गुणवत्ता तपासणीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, शहरी आरोग्य सेवा आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य संस्थांना पुरवठा होणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी या उपकरणाच्या वापराबाबत तज्ज्ञांच्या उपस्थितीत मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यानंतर शासन निर्णयाद्वारे राज्यातील आठ परिमंडळांसाठी प्रत्येकी एक उपकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ औषध निर्माण अधिकाऱ्यांचे उपकरण हाताळणीचे प्रशिक्षण महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे.
हेही वाचा – दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पीक नुकसानीची मदत; शंभूराज देसाईंची ग्वाही
प्रत्येक परिमंडळासाठी तपासणीचे वेळापत्रक
प्रत्येक परिमंडळातील जिल्ह्यांसाठी औषध तपासणीचे स्वतंत्र वेळापत्रक निश्चित करून प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी केली जाणार आहे. तपासणीची कार्यवाही, त्याचे अनुपालन, तपासण्यात आलेल्या औषधांची संख्या आणि सविस्तर अहवाल दर आठवड्याला सादर करावा लागणार आहे.
आरोग्य विभागाच्या सर्व आठ परिमंडळांमध्ये पुढील महिनाभर विशेष औषध गुणवत्ता तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नव्याने प्राप्त झालेल्या औषधांसह आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध औषधसाठ्यातील नमुने यादृच्छिक पद्धतीने तपासले जाणार आहेत.
प्राथमिक तपासणी, नमुने पुढील तपासणीसाठी पाठविणे, पुष्टीकरण अहवाल प्राप्त झाल्यानंतरची कार्यवाही आणि त्याची नोंद ठेवणे यासाठी स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येणार आहेत.
संयुक्त पथकांमार्फत तपासणी
सर्व आरोग्य संस्था राज्यस्तरीय रुग्णालय कक्षाच्या अधीन असल्याने ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’च्या वापराचे संनियंत्रण सहसंचालक, रुग्णालय स्तरावरील कक्षामार्फत करण्यात येणार आहे. संबंधित प्राधिकरण, रुग्णालय यंत्रणा आणि खरेदी यंत्रणेने संयुक्त पथके तयार करून तपासणीची कार्यवाही अधिक प्रभावी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
प्रत्यक्ष नमुन्यांवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
औषधनिहाय नमुना तपासणी, उपकरण हाताळणी, तपासणीच्या निकालांचे विश्लेषण आणि नोंद व्यवस्थापन याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, असेही आबिटकर यांनी सांगितले. प्रत्येक विभागात प्रत्यक्ष नमुन्यांवर सराव केल्यास तपासणीतील अचूकता वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपलब्ध करून देण्यात आलेल्या उपकरणांचा प्रभावी वापर करून क्षेत्रीय पातळीवर नियमित तपासणीची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण औषधांचा पुरवठा आणि नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य देत औषध गुणवत्ता तपासणीची प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबविण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.





