दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पीक नुकसानीची मदत; शंभूराज देसाईंची ग्वाही
माण, कोरेगाव आणि फलटण तालुक्यात बांधावर जाऊन पिकांची पाहणी; एकही बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही

सातारा : माण, कोरेगाव आणि फलटण तालुक्यात यंदा कमी पाऊस झाल्याने पाण्याअभावी शेतातील उभी पिके करपून गेली आहेत. या संकटामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, पीक नुकसानीची मदत तातडीने केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
पालकमंत्री देसाई यांनी कोरेगाव, फलटण आणि माण तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी देसाई म्हणाले की, एकही बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची सूचना प्रशासनाला देण्यात आली आहे. शासनाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे. प्रशासनाला पंचनामे पूर्ण करण्याबरोबरच त्याचे अहवाल तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती; सुहास पेडणेकर अध्यक्ष, महिनाभरात शासनाला अहवाल
“आज शेतकरी अडचणीत आहे. त्यांना पुन्हा उभे करण्याचे काम शासन करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश न होता नव्या उमेदीने पुन्हा उभे राहावे. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” अशी ग्वाहीही पालकमंत्री देसाई यांनी दिली.
पीक नुकसानीचे पंचनामे आणि अहवालाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.





