तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या चर्चेवर अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘सरकार जो विभाग देईल, तिथे काम करेन’
भविष्याचा फारसा विचार करत नाही, सध्याची जबाबदारी उत्तमपणे पार पाडण्यावर लक्ष; कामचुकार आणि तडजोड करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत असलेले राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा अधूनमधून होत आहे. या चर्चांबाबत तुकाराम मुंढे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भूमिका स्पष्ट केली आहे. ‘पुढची बदली कुठे होईल, हे माझ्या हातात नाही. सरकार जो विभाग देईल, तिथे मी काम करेन,’ असे त्यांनी सांगितले.
FDA मधून बदली झाल्यानंतर कोणत्या विभागात काम करण्यास आवडेल, असा प्रश्न मुंढे यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी भविष्यातील बदलीबाबत भाष्य करताना सध्याच्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका मांडली.
महाराष्ट्राबाहेर किंवा राष्ट्रीय पातळीवर काम करण्याबाबत विचारले असता मुंढे म्हणाले की, ‘मी भविष्याचा फारसा विचार करत नाही. सध्या ज्या पदावर आहे, ती जबाबदारी उत्तम प्रकारे कशी पार पाडता येईल, याकडे माझे लक्ष आहे.’ आपल्याला जी जबाबदारी दिली जाते, ती पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे असतात. भविष्याची चिंता सोडून वर्तमानात जगायला शिकले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कामचुकारपणावर कारवाईचा इशारा
मुलाखतीदरम्यान तुकाराम मुंढे यांनी प्रशासनातील कामचुकारपणा आणि तडजोडीच्या वृत्तीवरही स्पष्ट भूमिका मांडली. कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी कामचुकारपणा करत असेल किंवा तडजोड करताना दिसत असेल, तर त्यांच्याबाबत सहानुभूती दाखवण्याचे कारण नाही, असे त्यांनी म्हटले.
चुकीचे काम करणे किंवा दिलेले काम न करणे, या दोन्ही बाबींवर कारवाई होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
गोंदियात दूध भेसळीविरोधात कारवाई
दरम्यान, गोंदिया शहरात दुधातील भेसळीला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीने नुकतीच कारवाई केली. अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन, दुग्धव्यवसाय विकास, वैधमापन आणि पोलीस विभागाच्या पथकाने गोंदिया शहरातील एका दुग्ध डेअरीसह दासगाव येथील ‘शिवसागर डेअरी’वर अचानक धाड टाकली.
कारवाईदरम्यान अस्वच्छता आणि विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आल्याने संबंधित डेअरी तात्काळ बंद करून सील करण्यात आली. घटनास्थळावरून पनीर, दही, क्रीम, ताक, खवा तसेच अज्ञात रसायनांचा साठा जप्त करण्यात आला. मानवी आरोग्यास घातक असल्याचे आढळलेला माल जागेवरच नष्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.




