दिव्यांगांकडे सहानुभूतीने नव्हे, क्षमतेच्या दृष्टिकोनातून पाहा; राज्यपाल जिष्णु देव वर्मा
समान संधी निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी; ११ दिव्यांगांना व्हीलचेअरचे वितरण, ३२ जणांना राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार

मुंबई : दिव्यांग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाच्या नव्हे, तर क्षमता, प्रतिभा आणि दृढनिश्चयाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. त्यांच्याविषयी केवळ सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी समान संधी निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
लोकभवन सेवा संकल्प अभियानांतर्गत वर्मा फाउंडेशन आणि मैत्री पीस फाउंडेशन यांच्या वतीने वाय. बी. चव्हाण सभागृहात आयोजित व्हीलचेअर वितरण शिबीर आणि राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महामंडलेश्वर राजेश ओझा महाराज, मैत्री पीस फाउंडेशनचे अध्यक्ष सुरजित बरुआ, सचिव मिलन पारेख, वर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष वासुमुदुमुरी वर्मा, पी. एन. स्वामी महाराज, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, पद्मश्री पुरस्कार विजेत्या सोमा घोष, समाजसेवक नवीन चंद्र, राहुल पाटील यांच्यासह पुरस्कार विजेते, लाभार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत राज्यपाल वर्मा म्हणाले की, सेवाभावी आणि जनकल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’ची सुरुवात होत आहे. दिव्यांग व्यक्तींना मोफत व्हीलचेअरचे वितरण हा या अभियानाच्या सेवाभावी दृष्टिकोनाचा आदर्श आहे. स्वतःला लोकसेवेसाठी समर्पित करणे हाच वाढदिवस साजरा करण्याचा उचित मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
‘सेवा’ ही वृत्ती आणि जबाबदारी
सेवा ही केवळ एक कृती नसून वृत्ती, जबाबदारी आणि सामायिक मानवतेची अभिव्यक्ती आहे, असे राज्यपालांनी नमूद केले. महात्मा गांधी यांना प्रिय असलेल्या ‘वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड परायी जाणे रे’ या भजनाचा उल्लेख करत दुसऱ्यांचे दुःख आणि वेदना समजून घेणे हीदेखील सेवाच असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हीलचेअर हे केवळ हालचालीसाठीचे सहाय्यक साधन नसून दिव्यांग व्यक्तींसाठी सन्मान, स्वातंत्र्य आणि संधीचे माध्यम आहे. ‘विकलांग’ऐवजी ‘दिव्यांग’ हा शब्द वापरण्याच्या आवाहनातून समाजाच्या मानसिकतेत बदल घडविण्याचा संदेश देण्यात आला आहे. व्यक्तीमध्ये काय नाही यापेक्षा तिच्यातील असाधारण गुण आणि क्षमतांकडे पाहिले पाहिजे, असेही वर्मा म्हणाले.
दिव्यांगांचे कल्याण केवळ मदतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांचे सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकास साधणे आवश्यक आहे. ‘सुगम्य भारत अभियान’सारख्या उपक्रमांतून सार्वजनिक पायाभूत सुविधा दिव्यांगांसाठी सुलभ करण्याचे प्रयत्न होत आहेत. सरकार धोरणे आणि पायाभूत सुविधा निर्माण करू शकते; मात्र समाजपरिवर्तनासाठी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; ‘महिला शेतकरी पोर्टल’चे उद्घाटन
शिक्षण, कौशल्य आणि रोजगारावर भर
वर्मा फाउंडेशन आणि मैत्री पीस फाउंडेशन यांनी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण, सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशनासाठी अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले. स्वयंसेवी संस्थांनी गतिशीलता, सहाय्यक उपकरणे, शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार सहाय्याची गरज असलेल्या व्यक्तींची ओळख करून त्यांना योग्य शासकीय योजना आणि संस्थांशी जोडावे, असे त्यांनी सांगितले.
‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया’ हा आपल्या संस्कृतीचा मूलमंत्र असून प्रत्येकाला आनंदी आणि दुःखमुक्त जीवन जगण्याची संधी मिळाली पाहिजे, असेही वर्मा यांनी नमूद केले.
३२ जणांना राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार
राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना राज्यपाल म्हणाले की, प्रत्येक पुरस्कार विजेत्याच्या यशामागे कठोर परिश्रम, आव्हाने आणि दृढनिश्चयाची कहाणी असते. या सन्मानाकडे नवी जबाबदारी म्हणून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील प्रत्येक घटक भारताच्या विकास प्रवासात समान भागीदार झाल्यास ‘विकसित भारत @२०४७’चे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ११ दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअरचे वितरण करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ३२ व्यक्तींना राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आले.





