पिंपरी-चिंचवड आरटीओकडून ३९५ वाहनांवर दंडात्मक कारवाई!
काळी फिल्म, फॅन्सी नंबर प्लेटवर चाप; १५ दिवसांत ८ लाखांचा दंड वसूल

पिंपरी-चिंचवड | प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने दि. १ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान वाहनांवरील नियमबाह्य काळी फिल्म, आकर्षक अथवा फॅन्सी नंबर प्लेट, HSRP नंबर प्लेट नसलेली वाहने तसेच इतर राज्यात नोंदणीकृत लक्झरी ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान मोटार वाहन कायदा व संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण ३९५ चलन करण्यात आले असून, त्यापैकी १६७ चलनांचा भरणा करण्यात आला. त्यातून ८ लाख ९ हजार २७० रुपये दंड वसूल करण्यात आला.
कारवाईमध्ये नियमबाह्य काळी फिल्म प्रकरणी १६ चलनांपैकी ६ चलनांचा भरणा होऊन ३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर २७५ चलन करण्यात आले असून, १०६ चलनांचा भरणा होऊन १ लाख ८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
फॅन्सी नंबर/नियमबाह्य नोंदणी क्रमांक दर्शविण्याच्या प्रकरणी ५९ चलनांपैकी ३२ चलनांचा भरणा होऊन २० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
हेही वाचा
‘दगडूशेठ’ गणपतीला केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने अभिवादन
तसेच इतर राज्यातील नोंदणीकृत ट्रॅव्हल्स बसेसवर ४५ चलन करण्यात आले असून, २३ चलनांचा भरणा होऊन ६ लाख ७७ हजार ७७० रुपये दंड वसूल करण्यात आला.
वाहनमालकांनी आपल्या वाहनावर नियमबाह्य अथवा फॅन्सी नंबर प्लेट असल्यास ती तात्काळ काढून शासनाच्या नियमानुसार HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी. तसेच वाहनांच्या काचांना शासनाच्या नियमांचे उल्लंघन होईल अशा पद्धतीने काळी फिल्म लावू नये. वाहनांमध्ये अनधिकृत फेरबदल करून वाहनाची मूळ रचना अथवा सुरक्षा मानकांमध्ये बदल करू नये.
वाहनांची नंबर प्लेट शासनाने निर्धारित केलेल्या मानकांनुसार असणे आवश्यक आहे. वाहनांवर नियमबाह्य नंबर प्लेट, काळी फिल्म अथवा अनधिकृत फेरबदल आढळल्यास संबंधित वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, पुणे यांनी कळविले आहे.





