शाळा सोडल्यानंतरही शालेय रेकॉर्डमधील चूक दुरुस्त करता येणार; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
नाव, जन्मतारीख किंवा अन्य नोंदींतील नजरचुकीच्या चुका दुरुस्त करण्याचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

छत्रपती संभाजीनगर : शाळा सोडल्यानंतर शालेय रेकॉर्ड किंवा शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रातील चूक दुरुस्त करता येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, नोकरी किंवा इतर महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, आता अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शाळेतील रेकॉर्डमध्ये नजरचुकीने किंवा अनवधानाने झालेली चूक विद्यार्थी शाळा सोडल्यानंतरही दुरुस्त करता येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे.
या निर्णयामुळे शाळा सोडल्यानंतर प्रमाणपत्रातील नाव, जन्मतारीख किंवा अन्य नोंदींमध्ये चूक आढळलेल्या विद्यार्थ्यांसाठी दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. केवळ संबंधित विद्यार्थ्याने शाळा सोडली आहे, या कारणावरून त्याला शालेय रेकॉर्ड दुरुस्तीपासून वंचित ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
जालना जिल्ह्यातील प्रकरणातून निर्णय
हा महत्त्वपूर्ण निर्णय जालना जिल्ह्यातील जनाबाई हिमतराव ठाकूर यांच्या प्रकरणातून समोर आला. त्यांच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रातील चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता. मात्र, शाळा सोडल्यानंतर शालेय रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करता येत नाही, असे सांगत विभागाने त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली.
या प्रकरणात शासनाने माध्यमिक शाळा संहितेतील नियम २६.३ आणि २६.४ यांचा आधार घेतला होता. विद्यार्थ्याने शाळेत शिक्षण घेत असतानाच रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करता येते आणि शाळा सोडल्यानंतर अशी दुरुस्ती करता येत नाही, अशी शासनाची भूमिका होती.
हेही वाचा – बटाटे खाण्याची हेल्दी पद्धत; ‘हे’ ४ प्रकारचे पोटॅटो सॅलड नक्की ट्राय करा
औरंगाबाद, नागपूर खंडपीठाच्या निर्णयांमध्ये मतभेद
दरम्यान, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाच्या यापूर्वीच्या निर्णयांमध्ये या मुद्द्यावर वेगवेगळी मते असल्याचे समोर आले. त्यामुळे कायदेशीर स्थिती स्पष्ट करण्यासाठी हे प्रकरण पूर्णपीठाकडे सोपवण्यात आले.
पूर्णपीठाने स्पष्ट केले की, शालेय रेकॉर्डमधील चूक जाणीवपूर्वक केलेली नसून नजरचुकीने किंवा अनवधानाने झाली असेल, तर केवळ विद्यार्थ्याने शाळा सोडली आहे म्हणून ती चूक कायम ठेवता येणार नाही. संबंधित विद्यार्थ्याला योग्य पुरावे सादर करून आणि नियमानुसार नोंद दुरुस्त करून घेण्याची संधी मिळणे आवश्यक आहे.
शिक्षण, नोकरीच्या संधींना दिलासा
शालेय प्रमाणपत्रातील चुकीचे नाव, जन्मतारीख किंवा इतर नोंदींमुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, स्पर्धा परीक्षा, नोकरी, व्यवसाय तसेच विविध शासकीय कामकाजात अडचणी येऊ शकतात. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्याचा कायदेशीर मार्ग खुला झाला असून, संबंधित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.




