गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पुन्हा पावसाचा जोर; १४-१५ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज
उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता; मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक भागांना सतर्कतेचा इशारा

नागपूर : गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने १४ आणि १५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
राज्यात पावसाला पोषक वातावरण
राज्यात सध्या पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. १४ सप्टेंबरला कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून, उत्तर किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. काही भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही भागांसह नाशिक घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१५ सप्टेंबरलाही पावसाचा जोर
१५ सप्टेंबर रोजीही राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी अपेक्षित आहेत.
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, बीड, हिंगोली आणि नागपूरसह अनेक भागांत पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी तसेच गणेशमूर्तींच्या आगमन-विसर्जनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतपिकांवरही परिणामाची शक्यता
राज्यातील पावसाचा परिणाम मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सोयाबीन, कापूस आणि मका या खरीप पिकांवर होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. तसेच काढणीला आलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा.
मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वारे सुरू असताना नागरिकांनी मोकळ्या शेतात, रानात किंवा मोठ्या झाडाखाली थांबू नये. किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर प्रवास करताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भात तुरळक सरी
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत १४ सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असून, एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांतही काही ठिकाणी पावसाच्या सरी अपेक्षित आहेत.
दरम्यान, पुढील काही दिवसांत राज्यातील पावसाचे क्षेत्र झपाट्याने कमी होण्याचा अंदाज आहे. १५ सप्टेंबरनंतर विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाऐवजी तुरळक सरी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.




