पुणे महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला गती; पीएमआरडीएच्या प्रकल्पांना वेग देण्याचे सुनेत्रा पवार यांचे निर्देश
इनर रिंग रोड, मेट्रो, नदी प्रदूषण नियंत्रण, अग्निशमन केंद्रे आणि पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; ६७४ गावांसाठी एकात्मिक विकास आराखड्यावर भर

मुंबई : पुणे जिल्ह्याच्या नियोजित आणि सर्वांगीण विकासात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) भूमिका महत्त्वाची असून, पीएमआरडीए क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पीएमआरडीए क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतला. यावेळी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध प्रकल्पांची माहिती घेण्यात आली. बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात ६७४ गावांचा समावेश असून, सुमारे ५ हजार २१५ चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. पुणे महानगर प्रदेशाचा वेगाने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि पर्यटनाच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन पुढील अनेक वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या.
इनर रिंग रोडसह वाहतूक व्यवस्थेला गती
पुणे इनर रिंग रोड, कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनअंतर्गत प्रस्तावित प्रकल्प, हिंगणगाव पूल आणि यवत रेल्वे ब्रिज आदी कामांना आवश्यक ती गती देण्याचे निर्देश देण्यात आले. पुणे शहर आणि पीएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रभावी कनेक्टिव्हिटी विकसित करण्यावर भर देण्यात आला.
मल्टिमोडल हब, औद्योगिक क्षेत्रे, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे तसेच विमानतळाशी जोडणी यांचा एकात्मिक विचार करून वाहतूक नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
हिंजवडी मेट्रोला गती देण्याचे निर्देश
माण-हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता माण-हिंजवडी-शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३चे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. या २३ स्थानकांच्या मार्गिकेतील १२ स्थानके पूर्ण झाली असून, आणखी ५ स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
उर्वरित कामांना गती देऊन हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत लवकर आणण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा – नंदुरबारच्या विकासकामांना गती द्या; योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा : मंत्री हसन मुश्रीफ
नदी प्रदूषण नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य
इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. केवळ प्रकल्प उभारणे पुरेसे नसून, त्यांचे संचालन, देखभाल-दुरुस्ती आणि भविष्यातील खर्च भागवण्यासाठी संबंधित यंत्रणा आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण असणे आवश्यक असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
१२ नवीन अग्निशमन केंद्रांना गती
पीएमआरडीए क्षेत्रातील वाढते नागरीकरण लक्षात घेता अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. कासार आंबोली येथील अग्निशमन केंद्राचे काम सुरू असून, आणखी १२ अग्निशमन केंद्रे प्रस्तावित आहेत. या केंद्रांच्या कामांना गती देऊन नागरिकांना तत्पर अग्निशमन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
भविष्यातील पाणी गरजांसाठी दीर्घकालीन नियोजन
पीएमआरडीए क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील नागरी विस्तार लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतापासूनच दीर्घकालीन नियोजनातून सोडवण्यावर भर देण्यात आला. नवीन जलस्रोत उपलब्ध करण्याबरोबरच उपलब्ध जलस्रोत, वितरण व्यवस्था, नवीन नागरी वसाहती, औद्योगिक क्षेत्रे आणि पर्यटनस्थळांच्या भविष्यातील पाण्याची गरज यांचा एकत्रित विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पुणे महानगर प्रदेशाचा विकास केवळ रस्ते आणि इमारतींपुरता मर्यादित न राहता वाहतूक, पाणी, पर्यावरण, अग्निसुरक्षा, उद्योग, पर्यटन आणि नागरिकांचे जीवनमान यांचा सर्वंकष विचार करणारा असावा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.




