नागपुरातील आपत्ती पुनर्प्राप्ती डेटा सेंटरचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा : मंत्री आशिष शेलार
शासकीय माहितीची सुरक्षितता, उपलब्धता आणि विश्वासार्हता वाढणार; डेटा सेंटरच्या कामांचा मंत्र्यांकडून आढावा

नागपूर : शासनाच्या विविध विभागांच्या माहितीची सुरक्षितता, उपलब्धता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी नागपूर येथील आपत्ती पुनर्प्राप्ती (Disaster Recovery) डेटा सेंटर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर शासकीय कामकाज अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल. त्यामुळे सेंटरची उर्वरित कामे निर्धारित कालावधीत गतीने पूर्ण करावीत, असे आदेश राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
गड्डीगोदाम मेट्रो स्थानक येथे सुमारे १४ हजार चौरस फूट जागेत उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक आपत्ती पुनर्प्राप्ती डेटा सेंटरची शेलार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे नोडल अधिकारी लक्ष्मीकांत त्रिपाठी, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक संदीप बापट, महामेट्रोचे महाप्रबंधक सुधाकर उराडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आपत्कालीन परिस्थितीतही डेटा सुरक्षित राहणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा प्रकल्प शासनाच्या विविध विभागांची माहिती सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. डेटा सेंटरची आपत्कालीन परिस्थितीतील कार्यक्षमता आणि सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी विशेष नियोजन करावे, अशा सूचना शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या पुढील नियोजनाची माहितीही त्यांनी घेतली.
डेटा सेंटरच्या सुरळीत आणि अखंडित कामकाजासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबींची माहिती शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. सर्व्हर रूम, कंट्रोल रूम, विविध महत्त्वाचे कक्ष, इमर्जन्सी युनिट आणि सुरक्षा व्यवस्था यांची त्यांनी पाहणी केली.
कूलिंग सिस्टीम आणि पाण्याच्या पर्यायी व्यवस्थेवर भर
डेटा सेंटरमधील सर्व्हर सातत्याने योग्य तापमानात ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या कूलिंग सिस्टीमची तसेच त्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना शेलार यांनी दिल्या. आपत्कालीन परिस्थितीत पाणीपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पातील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय राखावा आणि कामाच्या गतीवर सातत्याने लक्ष ठेवावे, असे निर्देश देत शेलार यांनी डेटा सेंटरच्या सद्यस्थितीचा तसेच पुढील प्रत्येक टप्प्यातील कामांच्या नियोजनाचा आढावा घेतला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा




