Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, कर्तव्यभावना आणि राष्ट्रभक्ती रुजवा”; शिक्षक दिनी दादा भुसेंचे आवाहन

‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचा राज्यव्यापी शुभारंभ; राज्यात सुमारे ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू, आर्थिक अडचणीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फी सेस निधीतून भरणार

पुणे : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा शिक्षक दिन हा गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच त्यांच्यामध्ये संस्कार, कर्तव्यभावना, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजविणे ही शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. आई-वडिलांनंतर गुरुजनांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा आदर व सन्मान करावा, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त शालेय शिक्षण विभाग आणि पंचायत समिती मालेगाव यांच्या वतीने शिवगंगा लॉन्स, दाभाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मालेगाव पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी निलेश पाटील, विस्तार अधिकारी तथा वैज्ञानिक दृष्टिकोन समितीचे अध्यक्ष अमोल निकम, मालेगाव तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शिक्षणासोबत संस्कारही महत्त्वाचे

मंत्री भुसे म्हणाले की, आजच्या काळात विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे पुरेसे नाही, तर त्यांच्यामध्ये चांगले संस्कार रुजविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी आई-वडील, आजी-आजोबा आणि गुरुजनांचा आदर करावा. शाळेत आल्यानंतर शिक्षकांना मान-वंदना देण्याची संस्कृती निर्माण झाली पाहिजे.

शिक्षक हे केवळ विषयाचे ज्ञान देणारे नसून समाजाची भावी पिढी घडविणारे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्यासोबतच त्यांना आवश्यक सुविधा आणि सहकार्य देण्याची शासनाची भूमिका असल्याचे भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा –  “शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सत्यनिष्ठा, देशप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा”; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आवाहन

आर्थिक अडचणीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मदत

मालेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची फी भरण्यास आर्थिक अडचण असलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सेस निधीतून फी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वी शिष्यवृत्ती परीक्षा चौथी आणि सातवीच्या स्तरावर घेतली जात होती. त्यानंतर ती पाचवी आणि आठवीच्या स्तरावर घेण्यात आली. अनेक शाळांची रचना पहिली ते चौथी तसेच पहिली ते सातवी अशी असल्याने विद्यार्थ्यांना योग्य टप्प्यावर शिष्यवृत्ती परीक्षेची संधी मिळावी, यासाठी पुन्हा चौथी आणि सातवीच्या स्तरावर परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचा शुभारंभ

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वर्षानिमित्त ‘चला शाळेत जाऊया’ या अभियानाचा राज्यव्यापी शुभारंभ मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. हे अभियान ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

शाळांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. शाळांमधील सकारात्मक बाबी समाजासमोर आणण्यासोबतच ज्या ठिकाणी अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी प्रशासन, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असे भुसे म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्यासाठी मंत्रालयापासून आयुक्तालयापर्यंतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘शिक्षण पालक’ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. हे अधिकारी आपल्या दत्तक जिल्ह्यातील शाळांना भेटी देऊन चांगल्या कामाचे कौतुक करतील तसेच आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि सहकार्य करतील. मालेगाव तालुक्यातील शाळांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आरओ फिल्टरची सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात सुमारे ३० हजार शिक्षकांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १३ हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत असून नाशिक जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध होणार आहेत. ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, त्या ठिकाणी गुणवत्तेच्या आधारे शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील, असे भुसे यांनी सांगितले.

प्रतिकूल परिस्थितीतही समर्पित भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांची महाराष्ट्रात अनेक उदाहरणे आहेत. आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक केशव गावित यांच्या कार्याचा उल्लेख करताना भुसे यांनी त्यांच्या समर्पित वृत्तीचे कौतुक केले.

शाळा ही केवळ शिक्षक आणि विद्यार्थ्यांची नसून संपूर्ण गावाची जबाबदारी आहे. शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक यांनी एकत्रितपणे काम केल्यास शाळांचा सर्वांगीण विकास साधता येईल. शासकीय शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता आणि क्षमता वाढविण्यावर शासनाचा भर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मालेगावातील ६८२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

सन २०२६ मध्ये मालेगाव गटातील ६८२ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये इयत्ता चौथीचे २२९, पाचवीचे १३५, सातवीचे २०३ आणि आठवीचे ११५ विद्यार्थी आहेत. ही संख्या नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अव्वल असल्याचे सांगण्यात आले.

इयत्ता चौथी आणि पाचवीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ५ हजार रुपये याप्रमाणे तीन वर्षांसाठी, तर इयत्ता सातवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ७ हजार ५०० रुपये याप्रमाणे पुढील तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.

कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group