विनापरवानगी शाळेत गेल्यास गुन्हा दाखल करणार; मुंबई पोलिसांचा सीजेपीला इशारा
शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे; व्यवस्थापनाची परवानगी नसताना आंदोलन केल्यास कारवाई होणार, पोलीस आयुक्त देवेन भारती यांचा स्पष्ट इशारा

मुंबई : ‘कॉकरोच जनता पार्टी’ अर्थात सीजेपीकडून देशभरातील सरकारी शाळांना भेटी देऊन शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी समोर आणण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. शाळांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्याबरोबरच संबंधित प्रशासनाने तातडीने त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी सीजेपीकडून केली जात आहे. मात्र, या मोहिमेवर आता मुंबई पोलिसांनी आक्षेप घेतला असून विनापरवानगी शाळेत प्रवेश करून आंदोलन केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सीजेपीच्या शाळा भेटीच्या मोहिमेबाबत भूमिका स्पष्ट केली. सीजेपीचे कार्यकर्ते व्यवस्थापनाची परवानगी न घेता शाळांमध्ये जात असतील, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था या विद्यार्थी व शिक्षकांसाठी असतात. संबंधित संस्थेच्या व्यवस्थापनाची परवानगी नसेल, तर सीजेपीच्या नावाखाली अशा ठिकाणी आंदोलन करता येणार नाही. शाळा प्रशासनाने याबाबत तक्रार केल्यास पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे देवेन भारती यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – छगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “या वयात स्वतःचं राजकारण पाहा”
दरम्यान, सीजेपीने देशभरातील सरकारी शाळांची पाहणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपल्या मूळ गावातील शाळेपासून या मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर विविध शाळांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
या पाहणीदरम्यान काही शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था, तर काही ठिकाणी वर्गखोल्यांची खराब अवस्था समोर आल्याचा दावा सीजेपीकडून करण्यात आला आहे. सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी ही मोहीम सुरू असल्याचे सीजेपीकडून सांगण्यात येत आहे.
सीजेपीच्या मोहिमेमुळे सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरही चर्चा सुरू झाली आहे. विविध ठिकाणी शाळांच्या दुरुस्ती आणि मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाकडून उपाययोजना करण्यास सुरुवात झाल्याचा दावा संघटनेकडून केला जात आहे.
मात्र, शाळांमध्ये विनापरवानगी प्रवेश आणि आंदोलन करण्याच्या मुद्द्यावर आता पोलिसांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे सीजेपीच्या पुढील शाळा भेटी आणि मुंबई पोलिसांच्या इशाऱ्यानंतर संघटनेकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.




