डीजेविरोधातील भूमिकेमुळे विद्यानंद बापटांवर हल्ला; माजी गणेश मंडळ अध्यक्ष ताब्यात
संवाद सुरू असतानाच मारहाण; ‘गणेशोत्सवाबाबत बोलणाऱ्याला कानाखाली मारणार’ आरोपी संतोष चव्हाणचा दावा

पुणे : सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरच्या अमर्याद वापराला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी टिळक रोड परिसरात एका व्यक्तीने हल्ला केला. बापट हे ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना हा प्रकार घडला. या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेने संतोष चव्हाण याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
थेट संवादादरम्यान हल्ला
विद्यानंद बापट गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे आणि लाऊडस्पीकरच्या अमर्याद वापरावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. याच मुद्द्यावर ते टीव्ही ९ मराठीशी संवाद साधत होते.
यावेळी गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण तेथे आला. त्याने बापट यांच्याशी हुज्जत घालत, “तुला यावर आक्षेप घ्यायला कोणी सांगितलं?” असा सवाल केला. त्यानंतर वाद वाढला आणि संबंधित व्यक्तीने बापट यांच्यावर हात उगारत मारहाण केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला.
आरोपी संतोष चव्हाण कोण?
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संतोष चव्हाणचे वास्तव्य पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथे असल्याचे समोर आले आहे. तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत असून, राऊतवाडी येथील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याची माहिती आहे.
बापट यांच्या डीजे आणि साऊंड सिस्टिमविरोधातील भूमिकेमुळे संतोष चव्हाण संतप्त झाल्याने त्याने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – नागपुरात आजपासून डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईटवर बंदी; पुण्यातही मागणी जोरात
‘त्याला आणखी मारायला पाहिजे’
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना संतोष चव्हाण याने बापट यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. तो सातत्याने टीका करत असल्याने त्याला आणखी मारायला पाहिजे होते, अशी संतोष चव्हाण याने प्रतिक्रिया दिली. गणेशोत्सवाबाबत कोणी बोलले तर त्याला अशाच प्रकारे विरोध करू, असेही त्याने म्हटले.
नंतर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये त्याने साऊंड सिस्टिमचा आवाज मर्यादेत ठेवला तर अडचण नसल्याचे म्हटले. पुण्यात हजारो गणेश मंडळे असून गणेशोत्सवामुळे मोठी आर्थिक उलाढाल होते आणि अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो, असा युक्तिवादही त्याने केला.
विद्यानंद बापट म्हणाले, ‘प्रसिद्धीसाठी हल्ला’
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांनी प्रतिक्रिया देताना हा प्रकार प्रसिद्धी मिळवण्यासाठी करण्यात आल्याचे म्हटले. “सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी एक वेडा माणूस आला आणि त्याने हा प्रकार केला. त्याला केवळ प्रसिद्धीच्या झोतात यायचे होते,” अशी प्रतिक्रिया बापट यांनी दिली.
दरम्यान, पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेकडून संतोष चव्हाणची चौकशी सुरू असून, हल्ल्यामागील नेमकी पार्श्वभूमी आणि इतर बाबींचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे पुण्यातील गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.





