Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अमराळे गावाला मिळणार मुख्य रस्त्याची थेट जोडणी; ७ कोटी २० लाखांच्या पुलाचे भूमिपूजन

९ ते १२ महिन्यांत दर्जेदार काम पूर्ण करण्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश; पावसाळ्यातील वाहतुकीची अडचणही होणार दूर

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील अमराळे गावाला मुख्य रस्त्याशी थेट जोडण्यासाठी ७ कोटी २० लाख रुपये खर्चून पूल उभारण्यात येणार आहे. या पुलामुळे गावातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान होणार असून, ग्रामीण भागातील दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. पुलाचे काम येत्या ९ ते १२ महिन्यांत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

अमराळे येथे या पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात पालकमंत्री रावल बोलत होते. यावेळी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, सरपंच कविता मोरे, उपसरपंच कोकिळाबाई सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भूपेंद्र गिरासे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुलामुळे प्रवास होणार अधिक सुलभ

पालकमंत्री रावल म्हणाले की, अमराळे गावाने नेहमीच प्रेम, विश्वास आणि उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. ग्रामस्थांचा विश्वास आणि सहकार्य हीच विकासाची खरी ताकद आहे. गावाच्या विकासासाठी विविध कामांना सातत्याने चालना देण्यात आली असून, मुख्य रस्त्याशी जोडणारा हा पूल त्यातील महत्त्वाचा टप्पा आहे.

या पुलामुळे अमराळे गाव थेट मुख्य रस्त्याशी जोडले जाणार आहे. शिंदखेडा-चिमठाणे मार्ग, बाम्हणे फाटा तसेच परिसरातील अन्य गावांकडे जाण्यासाठी नागरिकांना अधिक सोयीचा मार्ग उपलब्ध होईल. सध्या वळसा घालून करावा लागणारा प्रवास पुलामुळे कमी होणार असून, नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.

पावसाळ्यातील अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा

सुमारे १४ फूट उंचीचा हा पूल पावसाळ्यातील वाहतुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे. नदी-नाल्याला अचानक पाणी आल्याने सध्या निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. दुचाकीस्वार किंवा नागरिक वाहून जाण्याचा धोका लक्षात घेऊन भविष्यातील गरजा विचारात घेऊन सुरक्षित आणि सक्षम पूल उभारण्यात येणार असल्याचे रावल यांनी सांगितले.

हेही वाचा –  गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी जवानांसोबत रक्षाबंधन साजरे केले

कामाच्या गुणवत्तेत तडजोड नको

श्रावण महिन्यात महादेव मंदिराच्या साक्षीने या महत्त्वाच्या कामाचे भूमिपूजन होत असल्याचा आनंद व्यक्त करत रावल म्हणाले की, पुलाचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, केवळ कामाचा वेग महत्त्वाचा नसून बांधकामाचा दर्जाही उत्कृष्ट असला पाहिजे.

काँक्रिट, क्युरिंग आणि इतर तांत्रिक बाबी निर्धारित निकषांनुसार पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. ग्रामस्थांनीही कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवावे आणि काम वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणा व कंत्राटदाराला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामीण भागातील विकासकामांना गती

मतदारसंघातील विकासकामांचा उल्लेख करताना रावल यांनी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागल्याचे सांगितले. रस्ते, पूल आणि अन्य मूलभूत पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचे दळणवळण अधिक मजबूत करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक दर्जाची बाजार समिती उभारण्याचा संकल्प

राज्याच्या पणन क्षेत्रालाही नवी दिशा देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रावल यांनी सांगितले. महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर अधोरेखित होईल, अशी मोठी बाजार समिती उभारण्याचा संकल्प असून, या प्रकल्पासाठी वाढवण बंदराजवळ सुमारे १,३०० ते १,४०० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या परिसराला बंदर, विमानतळ, बुलेट ट्रेन तसेच मुंबई-दिल्ली महामार्गासारख्या महत्त्वाच्या दळणवळण सुविधांचा लाभ मिळणार असल्याने बाजार समितीच्या प्रकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘लाडकी बहीण’ योजनेचाही उल्लेख

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा उल्लेख करताना रावल म्हणाले की, महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली ही योजना सातत्याने सुरू असून, पुढेही सुरू राहणार आहे. पात्र महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा करण्यात आली असून, महिलांना आर्थिक आधार देऊन त्यांच्या जीवनात सुरक्षितता आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

रस्ते, पूल, बाजार व्यवस्था आणि अन्य पायाभूत सुविधांसोबतच महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वांगीण विकास साधण्यावर शासनाचा भर आहे. अमराळे ग्रामस्थांनी आजवर दिलेले प्रेम, विश्वास आणि सहकार्य यापुढेही कायम राहील, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group