Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

केंद्रीय निधीचा ९५ टक्क्यांहून अधिक विनियोग करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागांना आदेश

पुढील वर्षी १६ ते १७ हजार कोटींचा केंद्रीय निधी खर्च करण्याची क्षमता; दर तीन महिन्यांनी निधी वापराचा आढावा घेण्याच्या सूचना

मुंबई : राज्यात केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीचा प्रभावी आणि वेळेत विनियोग करण्यास सर्व विभागांनी प्राधान्य द्यावे. केंद्रीय निधीचा परिपूर्ण वापर करून यावर्षी निधी विनियोगाचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक राहील, याची खबरदारी विभागप्रमुखांनी घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

केंद्रीय योजनांसाठी उपलब्ध निधी आणि त्याच्या विनियोगाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते.

राज्याच्या विविध योजनांसाठी उपलब्ध असलेल्या निधीला केंद्रीय योजनांच्या निधीची जोड देऊन त्याचा अधिक प्रभावी वापर करण्याचे नियोजन विभागांनी करावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय निधीचा पूर्ण क्षमतेने विनियोग केल्यास राज्यातील विकासकामांना अधिक गती देता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

पुढील वर्षी राज्याकडे सुमारे १६ ते १७ हजार कोटी रुपयांचा केंद्रीय निधी खर्च करण्याची क्षमता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या निधीतील मोठा हिस्सा भांडवली खर्चासाठी असल्याने विभागप्रमुखांनी त्याच्या विनियोगाला विशेष प्राधान्य द्यावे, असे निर्देश देण्यात आले.

हेही वाचा –  एसआयआर मोहिमेतील कर्मचाऱ्यांना ४५ दिवसांची विशेष रजा द्या; शिक्षक परिषदेची मागणी

विहित मुदतीत योजनांची व्यापक अंमलबजावणी करून उपलब्ध निधीचा वेळेत वापर करण्याची जबाबदारी संबंधित विभागांनी निश्चितपणे स्वीकारावी, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय क्षेत्रातील विविध योजनांसाठी कोणत्या विभागाकडे किती निधी उपलब्ध आहे, त्यापैकी किती निधी खर्च झाला आणि किती निधी शिल्लक आहे, याचा विभागनिहाय नियमित आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

लेखा प्रक्रियेतील अडचणींमुळे निधीचा विनियोग रखडत असल्यास त्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या दोन ते तीन वर्षांत विविध विभागांनी केलेल्या निधी खर्चाचे अवलोकन करून संबंधित त्रुटी दूर करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

काही विभागांकडून निधी प्रत्यक्षात खर्च झाला असला तरी तो लेखांकनामध्ये प्रतिबिंबित होत नसल्यास त्याची कारणे स्पष्ट करावीत. तसेच निधी खर्च झालेला नसेल तर तो विहित मुदतीत कसा खर्च करता येईल, याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

केंद्रीय निधीच्या विनियोगावर नियमित लक्ष ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या स्तरावर प्रभावी यंत्रणा उभारावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

तसेच दर तीन महिन्यांनी निधीच्या वापराचा आढावा घेऊन त्यासंदर्भातील आवश्यक निर्देशक निश्चित करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. केंद्रीय निधीचा वेळेत आणि प्रभावी विनियोग करून राज्यातील विकास योजनांना गती देण्यावर सरकारने विशेष भर दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group