अहिल्यानगर तालुक्यातील ६३ स्टोन क्रशर सील; गौण खनिज माफियांमध्ये खळबळ
महसूल प्रशासनाची मोठी कारवाई; प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महावितरणकडूनही स्वतंत्र तपासणीचे आदेश

अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील तब्बल ६३ स्टोन क्रशर आणि खाणपट्टे महसूल प्रशासनाने सील केले आहेत. खंडाळा, वारूळवाडी, कापूरवाडी आणि आरणगाव परिसरातील या सर्व खडीकरण केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली. तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी या कारवाईची माहिती दिली.
महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारवाईपूर्वी संबंधित स्टोन क्रशर चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर एकाच टप्प्यात सील करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली असून, शुक्रवारी अखेरच्या स्टोन क्रशरलाही सील करण्यात आले.
संबंधित सर्व स्टोन क्रशरनी आतापर्यंत केलेल्या उत्खननाची मोजणी आणि त्यासाठी भरलेल्या रकमेच्या चलनाचा ताळमेळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी स्पष्ट केले. संबंधित स्टोन क्रशरबाबत प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
गौण खनिज उत्खननाबरोबरच स्टोन क्रशरमुळे होणारे प्रदूषण आणि वीज वापरासंदर्भातील बाबींचीही तपासणी केली जाणार आहे.
हेही वाचा – केंद्रीय निधीचा ९५ टक्क्यांहून अधिक विनियोग करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागांना आदेश
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व स्टोन क्रशरची प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महावितरणकडून स्वतंत्र तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत.
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील १६ आमदारांच्या विधिमंडळ अंदाज समितीने नगर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या कामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला होता.
या दौऱ्यात समितीकडे स्टोन क्रशर आणि अवैध गौण खनिज उत्खननाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर समितीने अचानक कापूरवाडी आणि वारूळवाडी येथील स्टोन क्रशरची पाहणी केली.
कापूरवाडी येथे उत्खननामुळे संपूर्ण डोंगर गायब झाल्याची तक्रारही नागरिकांनी समितीकडे केली होती.
तालुक्यातील काही स्टोन क्रशरवर यापूर्वी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्या दंडाची वसुली झाली नसल्याच्या तक्रारीही समितीकडे करण्यात आल्या होत्या.
या सर्व तक्रारींची दखल घेत समितीने जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पूर्वी झालेल्या दिरंगाईचा आढावा घेतला. त्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे.
तालुक्यातील सर्व ६३ स्टोन क्रशर सील केल्याने अवैध गौण खनिज उत्खननाविरोधातील प्रशासनाच्या भूमिकेचा स्पष्ट संदेश गेला असून, पुढील चौकशी आणि सुनावणीनंतर या प्रकरणात काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.





