Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘‘गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते..’’; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

‘मंत्रीपद द्या, अन्यथा नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत’; सोनिया गांधींची परवानगी, मात्र मनमोहन सिंगांचा विरोध

मुंबई : भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मुंडे आणि काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यासोबत गुप्त बैठका झाल्या होत्या, असा दावा चव्हाण यांनी केला. सोनिया गांधी यांनी मुंडेंच्या पक्षप्रवेशाला मान्यता दिली होती; मात्र तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भाजपाच्या प्रमुख विरोधी नेत्याला काँग्रेसमध्ये घेऊन मंत्री करण्यास स्पष्ट विरोध केल्याने हा प्रवेश होऊ शकला नाही, असे त्यांनी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. गोपीनाथ मुंडे हे त्या काळात भाजपाच्या नेतृत्वावर नाराज आणि पक्षात अस्वस्थ असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

‘मला मंत्री करा, कारण पोटनिवडणूक लढावी लागेल’

आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील घटनाक्रम सांगताना चव्हाण म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये घेण्याबाबत चर्चा झाली होती. यासाठी सोनिया गांधी यांची परवानगी घेण्यात आली होती. मुंडे यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवावी लागणार असल्याचे सांगत त्यांना मंत्रिपद देण्याची अट ठेवली होती.

“मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल. भाजपाचे नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत. त्यावेळी तिथे जातीयवादाचा प्रश्न होता,” असे मुंडे म्हणाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

महाराष्ट्र सदनात गुप्त बैठका

मुंडेंच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशासाठी अत्यंत गुप्तपणे हालचाली करण्यात आल्याचा दावाही चव्हाण यांनी केला. कोणालाही याची माहिती मिळू नये म्हणून आपण महाराष्ट्र सदनातील एका हॉटेलमध्ये थांबलो होतो, असे त्यांनी सांगितले.

“माणिकराव ठाकरे त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होते. आमचं जवळपास सगळं ठरलं होतं. रात्री दोन वाजता अहमद पटेल आणि आमच्यात गुप्त बैठका झाल्या. सोनिया गांधी यांचीही परवानगी घेण्यात आली होती,” असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

‘कॅबिनेट मंत्रीपदाचे माहिती नाही, राज्यमंत्री करता येईल’

गोपीनाथ मुंडे यांनी मंत्रिपदाची मागणी केल्यानंतर आपण त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाबाबत निश्चित आश्वासन देऊ शकत नसल्याचे सांगितले होते. मात्र राज्यमंत्री करता येईल, असे आपण त्यांना सांगितल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मुंडे त्यावेळी भाजपाचे विरोधी पक्षातील उपनेते होते. पक्षातील परिस्थितीबाबत ते अस्वस्थ होते आणि नागपूरमधील दोन नेत्यांमुळे आपल्याला निवडून येण्यात अडचण निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

मनमोहन सिंगांचा विरोध; ‘माझ्याकडून मोठी चूक झाली’

मात्र या संपूर्ण प्रक्रियेत एक महत्त्वाची बाब आपल्या लक्षात आली नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. सोनिया गांधी यांची परवानगी घेतल्यानंतर आपण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची परवानगी घेणे राहून गेल्याची कबुली त्यांनी दिली.

“मी नंतर मनमोहन सिंग यांना भेटण्यासाठी गेलो. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी राजकीय चूक ठरली. मी पंतप्रधानांना न विचारता सोनिया गांधींना विचारून हो म्हटले होते. पंतप्रधानांनी मला विचारले की, तुम्ही हे परस्पर आश्वासन दिले आहे का? तेव्हा माझ्या लक्षात आले की मी मॅडमना विचारले, पण तुम्हाला विचारायचे राहून गेले,” असे चव्हाण यांनी सांगितले.

मनमोहन सिंग यांनी भाजपाच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला काँग्रेसमध्ये घेऊन मंत्री करण्यास स्पष्ट नकार दिल्याचेही त्यांनी सांगितले.

‘तुम्ही माझा राजकीय खून केलात’

मनमोहन सिंग यांच्या भूमिकेनंतर गोपीनाथ मुंडेंना काँग्रेसमध्ये घेणे शक्य नसल्याचे आपण त्यांना सांगितले. त्यावेळी मुंडे यांनी आपल्याला “तुम्ही माझा राजकीय खून केलात,” असे म्हटल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश प्रत्यक्षात झाला नसला, तरी त्या काळात त्यासाठी झालेल्या गुप्त राजकीय हालचालींचा दावा चव्हाण यांनी प्रथमच इतक्या स्पष्टपणे केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या गौप्यस्फोटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button