गोळीबार करून २२ तोळे सोन्याचे दागिने लुटणारे तिघे उज्जैनमधून अटकेत
ई-चलनावरील जुन्या दंडाच्या धाग्यावरून पुणे पोलिसांनी आरोपींचा माग काढला; तीन देशी पिस्तुले आणि सोन्याचे दागिने जप्त

पुणे : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर मोटार अडवून व्यावसायिकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करत त्याच्याकडील २२ तोळे सोन्याचे दागिने लुटून पसार झालेल्या तिघा दरोडेखोरांना पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैन परिसरातून अटक केली. गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी प्रतिबंध विभागाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढत ही कारवाई केली. आरोपींकडून तीन देशी बनावटीची पिस्तुले आणि सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अविनाश किशनचंद त्रिपाठी (वय ४३), सुरेंद्रपाल रामचंद्र पाल (वय ३२) आणि मोहम्मद शोएब वसीम खान (वय ३७) अशी आहेत. तिघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी असून, सध्या आरोपींपैकी त्रिपाठी हा बकोरी परिसरात राहत होता.
हेही वाचा – ‘सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी’; राज्यपाल जिष्णु देव वर्मा
५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील शिरसवाडी परिसरातून व्यावसायिक आणि त्याचा भाऊ मोटारीतून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची मोटार अडवली. त्यानंतर आरोपींनी मोटारचालकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला आणि त्याच्याकडील २२ तोळे सोन्याचे दागिने लुटून दुचाकीवरून पसार झाले.
घटनेनंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी प्रतिबंध विभागाकडून तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यातून आरोपी दुचाकीवरून पसार झाल्याचे स्पष्ट झाले.
ई-चलनाच्या जुन्या दंडामुळे आरोपींचा सुगावा
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या दुचाकींचे क्रमांक पोलिसांनी तपासले. त्यावेळी एका दुचाकीवर यापूर्वी दंडात्मक कारवाई झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्या दुचाकीवरील ई-चलनाची माहिती तपासली असता आरोपींपैकी एकाचे नाव निष्पन्न झाले. याच जुन्या ई-चलनाच्या नोंदीचा धागा पकडून पोलिसांनी आरोपींचा माग काढला.
तांत्रिक तपासातून आरोपी मध्य प्रदेशातील उज्जैन परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांचे पथक तातडीने उज्जैनला रवाना झाले. शुक्रवारी पोलिसांच्या पथकाने तिन्ही आरोपींना उज्जैन परिसरातून ताब्यात घेतले.
आरोपींना उज्जैनमधील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाकडून त्यांची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवण्यात आली असून, तिन्ही आरोपींना घेऊन पोलिसांचे पथक पुण्याकडे रवाना झाले आहे.
बकोरीत सुरक्षारक्षक म्हणून करत होते काम
तपासात आरोपी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अहिल्यानगर रस्त्यावरील बकोरी परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. परिसराची माहिती असल्याने आरोपींनी व्यावसायिकाच्या हालचालींवर लक्ष ठेवून दरोड्याचा कट रचला असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अविनाश त्रिपाठी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्रिपाठी याने यापूर्वी भारत आणि नेपाळमध्ये साथीदारांच्या मदतीने दरोडे टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
त्रिपाठीविरुद्ध १२ गंभीर गुन्हे
अविनाश त्रिपाठी याच्याविरुद्ध उत्तर प्रदेशात खून, खुनाचा प्रयत्न आणि लूटमार यांसारखे गंभीर स्वरूपाचे १२ गुन्हे दाखल आहेत. भारत आणि नेपाळमध्येही त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळ सरकारने त्याला पकडण्यासाठी रोख बक्षीस जाहीर केले होते.
२०१८ मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पोलीस पथकासोबत (STF) झालेल्या चकमकीनंतर त्रिपाठी याला अटक करण्यात आली होती. त्याचे साथीदार सुरेंद्रपाल पाल आणि मोहम्मद शोएब वसीम खान यांच्याविरुद्धही उत्तर प्रदेशात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलिसांकडून सुरू असून, आरोपींचा यापूर्वीच्या आणखी काही गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे. जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलांचा आणि सोन्याच्या दागिन्यांचा या गुन्ह्याशी असलेला संबंधही तपासला जात आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन आणि सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.





