प्रश्न विचारले की हात उचलला जातो, ही लोकशाही आहे का? दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर अभिनेता सुमीत राघवन आक्रमक!

Sumeet Raghavan | दिल्लीतील जंतर-मंतर येथे २० जुलै रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आणि पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जवर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. दिल्लीसह आता मुंबईतही या आंदोलनाचे पडसाद उमटू लागले आहेत. अनेक दिग्गज व्यक्ती यावर प्रतिक्रिया देत असतानाच, प्रसिद्ध अभिनेते सुमीत राघवन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुमीत राघवन यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “प्रश्न विचारू नका, जे चाललंय ते चांगलं चाललंय. प्रश्न विचारले की देशाचं नाव खराब होतं. आमच्या महाराष्ट्रात तर प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अपमान होतो, असाच दावा केला जातो. राजकीय नेत्यांच्या गुंडांनी डॉक्टरांना बेदम मारले, पुलांची पडझड झाली, २००५ च्या पुरानंतर २०२६ मध्येही वसई, विरार, नालासोपारा भागात तीन-तीन दिवस लाईट नसते; तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा
भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-२० संग्राम! सामने कधी, कुठे आणि किती वाजता? जाणून घ्या..
विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईवर संताप व्यक्त करताना ते म्हणाले, “प्रश्न विचारले की थेट हात उचलला जातो. सोशल मीडियावर सगळीकडे हेच चित्र पाहायला मिळत आहे. हे काय चाललंय? ही खरोखरच लोकशाही आहे की नाही? त्या मुलांची नेमकी काय चूक आहे? ही परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळता आली नसती का? अंदाज आल्यावर वेळेत संवाद का साधला गेला नाही? इतकं कठीण होतं का संवाद साधणे? मुलांवर ज्या अमानुषपणे मारहाण झाली, ती मुलं आपल्याच देशाची आहेत ना?”
भाजप आमदार सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना सुमीत राघवन म्हणाले, “आमच्या महाराष्ट्राचे एक नेते म्हणाले की हे दहशतवादी आहेत. ही मुलं दहशतवादी आहेत का? ही मुलं आपलं भविष्य आहेत! कृपया तुमच्या सत्तेच्या खुर्चीवरून खाली उतरा आणि त्यांच्याशी संवाद साधा. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना विश्वास द्या, जसे घरातील मोठे लोक प्रेमाने बोलतात.”
विद्यार्थ्यांच्या संघर्षाचे कौतुक करताना त्यांनी शेवटी म्हटले, “मी एक खूप लहान कलाकार आणि सामान्य नागरिक आहे, पण या मुलांच्या ताकदीला माझा सलाम आहे आणि मी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे.”





