भारतीय शिक्षणाला नवी दिशा: पुण्यात ‘भारतीय शिक्षा बोर्ड’चे कार्यालय अन् आधुनिक गुरुकुल उभारणार
हरिद्वार येथील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; विनायकराव भोंगाळे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात कामाला गती

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
भारतीय संस्कृती, मूल्याधारित शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुवर्णमध्य साधत देशात नवी शिक्षणव्यवस्था उभी करण्यासाठी भारतीय शिक्षा बोर्ड (BSB), भारतीय शिक्षण अनुसंधान परिषद (BSAP) आणि पतंजली योगपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हरिद्वार येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पुण्यात भारतीय शिक्षा बोर्डाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यासह सैनिक शाळेच्या धर्तीवर आधुनिक निवासी गुरुकुल उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत योगगुरू स्वामी रामदेव, आचार्य बालकृष्ण, भारतीय शिक्षा बोर्डाचे अध्यक्ष डॉ. एन. पी. सिंह (निवृत्त IAS) आणि भारतीय शिक्षण अनुसंधान परिषदेचे महासंचालक विंग कमांडर डॉ. पुष्कल विजय द्विवेदी (निवृत्त) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पुणे ठरणार भारतीय ज्ञानपरंपरेचे केंद्र
शिक्षणाची विद्यानगरी असलेल्या पुण्यात भारतीय शिक्षा बोर्डाचे कार्य व्यापक करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते विनायकराव भोंगाळे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात आणि पालघर येथे गुरुकुल आधारित निवासी विद्यालये उभारण्याचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे.
या प्रस्तावित गुरुकुल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना खालील घटकांचे एकत्रित धडे दिले जातील:
भारतीय ज्ञानपरंपरा: वेद, उपनिषदे, संस्कृत, योग, आयुर्वेद व संस्कारमूल्ये.
आधुनिक शिक्षण: विज्ञान, गणित, तंत्रज्ञान, इंग्रजी भाषा आणि स्पर्धा परीक्षांचे विशेष प्रशिक्षण.
हेही वाचा
मुंबई आणि पुण्यात कार्यालयांचा विस्तार
महाराष्ट्रात राष्ट्रीय शिक्षण धोरणास (NEP) सुसंगत अशा मूल्याधारित शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी पुणे आणि मुंबई येथे बोर्डाची प्रादेशिक कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्र आणि सामाजिक संघटनांना या चळवळीशी जोडणे अधिक सुलभ होणार आहे.
“भारताची शिक्षणव्यवस्था केवळ रोजगारापुरती मर्यादित न राहता, त्यातून राष्ट्रभक्ती, चारित्र्यनिर्मिती, नेतृत्वगुण आणि संशोधनाची वृत्ती जपली गेली पाहिजे. पुण्यात उभारले जाणारे आधुनिक गुरुकुल विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम करेल.”
या बैठकीला गौरव पांडे, हेमदेव थापर, उद्योगपती व समाजसेवक पुरुषोत्तम शर्मा, डॉ. भाग्यश्री, प्रवीण टबके आणि योगेश भोंगाळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राला भारतीय शिक्षणाच्या या राष्ट्रीय चळवळीशी जोडण्यासाठी विनायकराव भोंगाळे यांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.





