पुनावळेतील SIR मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मतदार यादी अद्ययावतीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी
आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ ढवळे यांचा पुढाकार; अधिरा इंटरनॅशनल स्कूल येथे विशेष मोहीम सुरू

पिंपरी- चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुनावळे गावचे युवा नेते तथा अधिरा इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन नवनाथ मारुती ढवळे यांच्या पुढाकाराने अधिरा इंटरनॅशनल स्कूल, पुनावळे येथे सुरू असलेल्या SIR (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिनांक २२ व २३ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
पुनावळे, गायकवाड नगर, काटेवस्ती, माळवाडी, कोयतीवस्ती तसेच परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांमधील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत मतदार यादीतील नाव, पत्ता व इतर आवश्यक माहिती अद्ययावत करून घेतली. लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी नागरिकांनी दाखविलेल्या उत्साहाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
या मोहिमेचे नियोजन व यशस्वी अंमलबजावणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. ज्योती तपकीर यांचे तसेच मोहिमेत कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकवृंदाचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या परिश्रम, समन्वय आणि सेवाभावी वृत्तीमुळे ही मोहीम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडत असल्याचे नवनाथ ढवळे यांनी सांगितले.
हेही वाचा – पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा मानकरी ठरला मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगे

यावेळी नवनाथ ढवळे यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच, ज्या मतदारांनी अद्याप आपली माहिती अद्ययावत केलेली नाही, त्यांनी अधिरा इंटरनॅशनल स्कूल येथे भेट देऊन या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. ही मोहीम पुढील दोन दिवस सुरू राहणार असल्याने नागरिकांनी वेळेत आपली माहिती अद्ययावत करून घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.
या केंद्रावर भारत निवडणूक आयोगाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले सर्व बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) उपस्थित असून, ते मतदारांना SIR प्रक्रियेसंदर्भात आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करत आहेत. मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा पाया असून, प्रत्येक नागरिकाने मतदार यादीतील माहिती वेळेत अद्ययावत करून आपल्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करावे आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“मतदानाचा हक्क हा आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. प्रत्येक मतदाराने आपले नाव व माहिती मतदार यादीत अचूक आणि अद्ययावत असणे ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून, ती लोकशाही बळकट करण्याची सामूहिक बांधिलकी आहे. अधिरा इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या SIR मोहिमेला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही लोकशाहीप्रती असलेल्या जागरूकतेची साक्ष आहे. ज्या नागरिकांनी अद्याप आपली माहिती अद्ययावत केलेली नाही, त्यांनी या मोहिमेचा लाभ घेऊन आपल्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करावे, असे मी आवाहन करतो.”
— नवनाथ मारुती ढवळे, चेअरमन, अधिरा इंटरनॅशनल स्कूल, पुनावळे.





