मोरया शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात
शिक्षण विश्व : दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा गौरव

पिंपरी-चिंचवड | श्रीधरनगर, चिंचवड येथील मोरया शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन तसेच इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा २०२५-२६ मध्ये विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या तसेच ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. मनोजकुमार देवणे, संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल शेडगे, कार्यवाह व प्राचार्या सौ. इंद्रायणी माटे-पिसोळकर, खजिनदार रणजीत सावंत आणि तहहयात विश्वस्त ऋत्विक पिसोळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत आणि ईशस्तवन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी डॉ. मनोजकुमार देवणे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाचा योग्य व जबाबदारीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले.

हेही वाचा
चिंचवडमध्ये प्रतिभा महाविद्यालयाचा वारकऱ्यांना सेवाभावी उपक्रम
यानंतर क्रीडा, विविध बाह्य परीक्षा, गणित ऑलिंपियाड, इतिहास प्रज्ञाशोध स्पर्धा तसेच दहावी-बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, पदक आणि पुष्प देऊन गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह गुणवंत शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात कार्यवाह, तहहयात विश्वस्त तथा प्राचार्या सौ. इंद्रायणी माटे-पिसोळकर यांनी संस्थेच्या गेल्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आणि प्रगतीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल शेडगे यांनी संस्थेच्या विकासात शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, उपमुख्याध्यापक दिलीप कुमावत, पर्यवेक्षिका मैत्रेयी राजे, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नेहा यांनी केले, तर उपमुख्याध्यापक दिलीप कुमावत यांनी उपस्थितांचे आभार मानले.




