मतदार यादी अद्ययावतीकरण (SIR) मोहिमेत १०० टक्के सहभाग नोंदवा!
सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सचिन लोंढे यांचे गृहनिर्माण संस्थांना आवाहन

पिंपरी-चिंचवड | भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन (PCCHSF) पुढाकार घेत असून, शहरातील सर्व गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या लोकशाही बळकटीकरणाच्या राष्ट्रीय मोहिमेत शंभर टक्के सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन फेडरेशनचे अध्यक्ष सचिन लोंढे यांनी केले आहे.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. ६ जुलै) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सचिन लोंढे यांच्या नेतृत्वाखाली पीसीसीएचएसएफच्या शिष्टमंडळासह शहरातील विविध गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीमध्ये गृहनिर्माण संस्थांमध्ये वास्तव्यास असलेल्या पात्र नागरिकांची मतदार नोंदणी सुलभ करणे, नवमतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदार यादीतील त्रुटी दूर करणे तसेच संपूर्ण प्रक्रिया वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी प्रशासनाला कशा प्रकारे सहकार्य करावे, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना सचिन लोंढे म्हणाले की, लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अत्यावश्यक आहे. मतदार नोंदणी ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून प्रत्येक नागरिकाचे लोकशाहीप्रती असलेले कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक गृहनिर्माण संस्थेने या मोहिमेला प्राधान्य देत आपल्या परिसरातील एकही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
हेही वाचा
डॉ. सुहास कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल नागरिक सेवा उपक्रम
ते पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष, सचिव आणि व्यवस्थापन समितीने एसआयआर मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले बूथ लेव्हल अधिकारी (BLO) प्रत्येक नागरिकाच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी आणि नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. या अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व माहिती, सहकार्य आणि सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रत्येक सोसायटीची जबाबदारी आहे.
प्रत्येक पात्र नागरिक मतदार म्हणून नोंदणीकृत व्हावा, यासाठी सोसायटी स्तरावर जनजागृती करावी, नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची माहिती द्यावी आणि बीएलओंना भेटीदरम्यान सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
लोंढे यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बीएलओ संबंधित नागरिकाच्या घरी तीन वेळा भेट देऊनही जर संबंधित व्यक्तीने एसआयआर प्रक्रियेत सहभाग घेतला नाही, तर त्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे अपील प्रक्रिया करावी लागू शकते. त्यामुळे कोणत्याही नागरिकाने ही प्रक्रिया दुर्लक्षित करू नये. वेळेत सहभाग नोंदविल्यास भविष्यात मतदानाचा अधिकार अबाधित राहण्यास मदत होईल.
पीसीसीएचएसएफच्या वतीने सर्व गृहनिर्माण संस्थांना या मोहिमेत प्रशासनासोबत समन्वय साधून काम करण्याचे तसेच प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार नोंदणी पूर्ण होईल, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेत गृहनिर्माण संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक सोसायटीचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आपल्या सोसायटीतील प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार नोंदणी शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. बीएलओ नागरिकांच्या घरी भेट देणार असल्याने त्यांना आवश्यक ते सहकार्य करणे ही आपली लोकशाहीप्रती असलेली सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक पात्र नागरिक मतदार झाला पाहिजे, यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.
– सचिन लोंढे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन (PCCHSF)





