Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे’; मंत्री गिरीश महाजन

मुंबई : राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत पाऊस सुरू आहे. विशेषतः मुंबईत चांगला पाऊस होत असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी नद्या, नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यांतील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

मंत्री महाजन यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन पाहणी केली आणि अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शासकीय यंत्रणेस सतर्कतेच्या सूचना दिल्या. याप्रसंगी विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, संचालक डॉ भालचंद्र चव्हाण उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले की, भारतीय हवामान विभागाने ३ आणि ५ जुलै रोजी राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती!

ते म्हणाले, राज्य शासन आणि प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र प्रत्येक नागरिकानेही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

मुंबईतील काही भागांत पावसामुळे पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना केल्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून बहुतांश ठिकाणी जनजीवन सुरळीत झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री महाजन यांनी सांगितले की, मुंबई महापालिका तसेच संबंधित सर्व यंत्रणांच्या सातत्याने संपर्कात राहून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, सुरक्षित राहावे आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

नागरिकांना आपत्तकालीन परिस्थितीत संपर्कसाठी राज्य आपत्तकालीन नियंत्रण कक्षाचे 24×7 हेल्पलाइन क्रमांक : 1070, 09321587143, 022-22027990, 022-22794229 असून जिल्हास्तरीय संपर्क क्रमांक: 1077 आहे.

या भेटीदरम्यान, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी सद्यस्थिती, तयारीची सद्यस्थिती आणि विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या प्रमुख उपाययोजनांची माहिती दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button