ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका सुरक्षा रखवालदारांच्या थेट पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी!

विधी समिती सभापती सुजाता निलेश बोराटे यांच्या संवेदनशील नेतृत्वाचा मोठा विजय

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांमध्ये अहोरात्र प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या आणि मनपा मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या शेकडो सुरक्षा रखवालदारांसाठी (सुरक्षा रक्षक) एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सुरक्षा रक्षकांच्या पदोन्नतीचा क्लिष्ट आणि रखडलेला प्रश्न महानगरपालिकेच्या विधी समितीच्या सभापती सुजाता निलेश बोराटे यांनी अत्यंत कणखर आणि संवेदनशील पाऊल उचलून यशस्वीपणे मार्गी लावला आहे.

पात्र सुरक्षा रखवालदारांना आता अधिक आर्थिक लाभ आणि सन्मान मिळवून देण्यासाठी, त्यांना ‘सुरक्षा सुपरवायझर’ ऐवजी थेट ‘सुरक्षा निरीक्षक’ या उच्च पदावर पदोन्नती देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव विधी समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. सभापती सुजाता बोराटे यांच्या या कामगारकेंद्री आणि धडाकेबाज निर्णयामुळे मनपाच्या सुरक्षा विभागात आनंदाचे वातावरण असून, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाचे मनापासून आभार मानले आहेत.

यापूर्वी महापालिकेत सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची रचना अत्यंत क्लिष्ट आणि दीर्घकालीन होती. मूळ नियमांनुसारः १) पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या सुरक्षा रखवालदाराला सुरुवातीला ‘सुरक्षा सुपरवायझर’ या पदावर बढती दिली जात असे. २) त्यानंतर, तेथे काही वर्षे सेवा पूर्ण केल्यावर आणि पात्रता सिद्ध झाल्यावरच त्या सुपरवायझरला ‘सुरक्षा निरीक्षक’ या पदावर पदोन्नती मिळत होती. ३) या दुहेरी रचनेमुळे सुरक्षा रक्षकांना वाढीव वेतनश्रेणी मिळण्यास अनेक वर्षांचा विलंब होत होता आणि अनेक जण निवृत्त होईपर्यंत त्यांना हक्काचा फायदा मिळत नव्हता.

हेही वाचा –  ‘इंद्रायणी आमची नदीमाता’ : नदी सुधार प्रकल्पाचे स्वागत

या कर्मचाऱ्यांच्या व्यथा समजून घेत विधी समितीच्या अध्यक्षा सुजाता निलेश बोराटे यांनी या रचनेचा सखोल अभ्यास केला. त्यांनी थेट ‘सुरक्षा सुपरवायझर’ व ‘सुरक्षा निरीक्षक’ या दोन्ही पदांचे तांत्रिक समायोजन करून हे पद आता केवळ ‘सुरक्षा निरीक्षक’ असे एकच ठेवण्याचा महत्त्वपूर्ण तोडगा काढला. या नव्या रचनेमुळे आता पात्र ठरलेले सुरक्षा रक्षक थेट ‘सुरक्षा निरीक्षक’ बनू शकतील, ज्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फायदा आणि प्रशासकीय अधिकार मिळतील.

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील विधी समिती दालनात सभापती सुजाता निलेश बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष बैठक पार पडली. सुजाता बोराटे यांनी मांडलेल्या या कल्याणकारी ठरावाला सर्वपक्षीय विधी समिती सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. या बैठकीला नगरसदस्य ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, आणि तुषार सहाणे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

होर्डिंग स्ट्रक्चरल ऑडिट व उत्पन्न वाढ

केवळ सुरक्षा रक्षक पदोन्नतीच नव्हे, तर शहराच्या सुरक्षिततेशी आणि मनपाच्या तिजोरीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सभापती सुजाता बोराटे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शहरात पावसाळ्यात होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी सर्व अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग्जचे तात्काळ ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ पूर्ण करून अधिकृत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच मनपा महसूल वाढ महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा, आरक्षित भूखंड आणि व्यावसायिक मालमत्तांचा ताबा मिळवून मनपाच्या उत्पन्नात कशी वाढ करता येईल, याचे सूक्ष्म नियोजन त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“महानगरपालिकेचा प्रत्येक सुरक्षा रखवालदार हा आपल्या शहराचे आणि पालिकेचे अहोरात्र रक्षण करणारा खरा रक्षक आहे. उन्हातान्हात, थंडी-पावसात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या या कष्टकऱ्यांच्या हक्काच्या पदोन्नतीचा विषय गेली अनेक वर्षे धूळ खात पडून होता, मी जेव्हा या पदाची धुरा हाती घेतली, तेव्हाच सुरक्षारक्षकांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प केला होता. विधी समितीने आज केलेल्या या पदांच्या समायोजनाच्या ठरावामुळे आमच्या शेकडो बांधवांना थेट ‘सुरक्षा निरीक्षक’ बनण्याची आणि आर्थिक सुबत्ता मिळण्याची संधी मिळाली आहे. आगामी काळातही प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन !”

– सुजाता निलेश बोराटे, सभापती, विधी समिती, पिं. चिं. मनपा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button