‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर दक्षिण मुख्यालयाचे नवे प्रमुख

पुणे : लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुख पदी (आर्मी कमांडर) लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांची नियुक्ती करण्यात आली. पुष्कर यांनी बुधवारी पदाची सूत्रे स्वीकारली. तर मावळते प्रमुख लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) माजी विद्यार्थी असलेले लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर डिसेंबर १९८८ मध्ये ‘७४ आर्मर्ड रेजिमेंट’मध्ये रुजू झाले होते. ते गेल्या चार दशकांहून अधिक काळ लष्करात कार्यरत असून त्यांनी आकापर्यंतच्या सेवा काळात विविध भौगोलिक आणि धोरणात्मक वातावरणात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यात त्यांनी आर्मर्ड रेजिमेंट, स्वतंत्र आर्मर्ड ब्रिगेड, पायदळ तुकडी आणि स्ट्राईक कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. तसेच स्ट्राईक कॉर्प्समध्ये कर्नल मिलिटरी सेक्रेटरी, पश्चिम क्षेत्रातील आर्मर्ड डिव्हिजनचे कर्नल जनरल स्टाफ, स्ट्राईक कॉर्प्सचे ब्रिगेडियर क्वाटरमास्टर जनरल, ऑपरेशनल कमांडचे ब्रिगेडियर जनरल स्टाफ, आर्मर्ड कॉर्प्सचे अतिरिक्त महासंचालक, प्रादेशिक सेनेचे (टेरिटोरियल आर्मी) महासंचालक, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), खडकवासला येथे प्रशिक्षक (इन्स्ट्रक्टर) म्हणूनही सेवा दिली आहे.
पुष्कर यांना भूतानमधील भारतीय लष्करी प्रशिक्षण पथकाचा (आयएमटीटीआरएटी) भाग म्हणून आणि मॉस्को येथील भारतीय दूतावासात ‘डिफेन्स अँड मिलिटरी अटॅचे’ (आर्मेनिया आणि बेलारूसच्या अतिरिक्त जबाबदारीसह) म्हणून दोन आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा अनुभव आहे. डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट आणि भारतातील प्रतिष्ठित नॅशनल डिफेन्स कॉलेजचे पदव्युत्तर पदवीधर आहेत. त्यांच्या नागरी शैक्षणिक अर्हतेमध्ये ‘डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज’मध्ये पदव्युत्तर पदवी, ‘मॅनेजमेंट स्टडीज’मध्ये पदव्युत्तर पदवी आणि ‘डिफेन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स’मध्ये एम.फिल. केले आहे. त्यांच्या योगदानासाठी अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, चीफ ऑफ आर्मी स्टाफ प्रशस्तीपत्र आणि तीन आर्मी कमांडर प्रशस्तीपत्रांनी सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा – एकनाथ शिंदे आज दिल्ली गाठणार? ‘या’ दोन खासदारांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता
पदभार स्वीकारल्यानंतर लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी ‘दक्षिण कमांड युद्ध स्मारका’वर श्रद्धांजली वाहिली. दक्षिण मुख्यालयात त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. विविध क्षेत्रांमध्ये उच्च पातळीवरील सज्जता राखण्यासाठी दक्षिण कमांडच्या वचनबद्ध आहे. तिन्ही दलांमधील समन्वय, स्वदेशी क्षमतांचा विकास आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा जलद अंतर्भाव यावर भर राहणार आहे. भारतीय लष्कराच्या गौरवशाली परंपरांचे जतन करत सर्व सैनिक देशाच्या सेवेसाठी उत्कृष्टतेचे सर्वोच्च निकष राखतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांनी ‘२ कॉर्प्स’चे निर्णायक नेतृत्व करत धोरणात्मक दूरदृष्टी दाखवली होती.





