ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

स्वयंघोषित नेत्यांना दणका: भाजपामध्ये पक्षशिस्तीला ‘चॅलेंज’, त्यांच्यावर आता ‘ॲक्शन’

कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; संघटनेत काम दाखवा, अन्यथा पदलाभ नाही

पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटनेत पक्षशिस्तीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णायक संदेश देण्यात आला असून, पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर ‘ॲक्शन’ घेतली जाणार आहे. पक्षाच्या भूमिकेशी विरोधाभासाची भूमिका घेणे, सार्वजनिक वक्तव्ये आणि संघटनात्मक शिस्तभंग करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शहर कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, “संघटनेत कामगिरी दिसली तरच पदलाभ, अन्यथा कोणालाही सूट नाही,” असा स्पष्ट इशारा वरिष्ठ नेतृत्वाकडून देण्यात आहे. गेल्या काही महिन्यांत शहर भाजपामध्ये काही पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून परस्परविरोधी वक्तव्ये, अंतर्गत मतभेद आणि संघटनेच्या निर्णयांवर उघडपणे भाष्य करण्याच्या घटनांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. याची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेलेली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत संघटनात्मक शिस्त अधिक कडक करण्यावर एकमत झाल्याचे समजते.

भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड जिल्हयाची कोअर समितीची बैठक शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. यावेळी गेल्या काही महिन्यांपासून होत असलेले पक्षाची विविध अभियाने यांचा आढावा व आगामी संघटनात्मक कार्यक्रम आणि महानगरपालिके संदर्भात विविध विषयांवर अत्यंत महत्त्वाची चर्चा या बैठकीत झाली व यावेळी काही महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले.

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारुढ पक्षनेता प्रशांत शितोळे उपस्थित होते.

बैठकीत स्पष्ट करण्यात आले की, पक्षाची अधिकृत भूमिका हीच अंतिम मानली जाईल. संघटनेच्या व्यासपीठावर चर्चा न करता सार्वजनिकरित्या भूमिका मांडणे, माध्यमांद्वारे दबावतंत्र वापरणे अथवा पक्षाच्या निर्णयांवर टीका करणे हे शिस्तभंग मानले जाईल. अशा प्रकारांना यापुढे कोणतीही मुभा दिली जाणार नसून, संबंधितांवर संघटनात्मक कारवाई केली जाईल.

यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या कामाचा स्वतंत्र आढावा घेण्याचाही निर्णय झाला आहे. बूथ स्तरावरील काम, संघटन विस्तार, सदस्य नोंदणी, जनसंपर्क, सामाजिक उपक्रम आणि पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्यांची प्रभावी अंमलबजावणी या निकषांवर पदाधिकाऱ्यांचे मूल्यमापन होणार आहे. केवळ पद धारण करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कामगिरी करणाऱ्यांनाच भविष्यात संघटनेत संधी दिली जाईल, असा स्पष्ट संदेश बैठकीत देण्यात आला.

भाजपाची संघटनात्मक ताकद वाढविणे, अंतर्गत समन्वय अधिक मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांसाठी सक्षम यंत्रणा उभी करणे, या उद्देशानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात शहर भाजपामध्ये पक्षशिस्तीबाबत अधिक कठोर भूमिका पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, महापालिकेतील महत्वाची पदे, स्वीकृत सदस्य नियुक्ती आणि प्रभागस्तरीय स्वीकृत सदस्यांची नियुक्तीचे अधिकार स्थानिक पातळीवर घेण्यात येणार आहेत. त्यासाठी पक्ष संघटनेचे कार्य आणि पक्षाच्या नियमांच्या चौकटीतून राहून काम दाखवावे लागणार आहे. ‘‘हम करें सो कायदा…’’ अशी भूमिका घेणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांना चाप लावण्यात आला आहे. त्याची जबाबदारी स्थानिक पक्षश्रेष्ठींनी नेतृत्त्वाकडे सोपवण्यात आली आहे.

“भारतीय जनता पक्ष ही शिस्त, संघटन आणि कार्यकर्त्यांच्या कष्टावर उभी असलेली विचारसरणी आहे. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही. संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्यांनाच भविष्यात संधी मिळेल. पक्षविरोधी भूमिका किंवा शिस्तभंग कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.”
— शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड. 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button