पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक सर्वोच्च सन्मान, गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन पुरस्कार प्रदान; ‘या’ कार्याची घेतली दखल

PM Modi Seychelles highest honour Guardian of the Blue Horizon award : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन पुरस्कार प्रदान केला आहे. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील कामगिरीसाठी सेशेल्सने हा सर्वोच्च सन्मान दिला असून, यामध्ये हवामान कृती (क्लायमेट ॲक्शन), हरित विकास (ग्रीन ग्रोथ) आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली आहे. शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण आणि ब्लू इकॉनॉमी (सागरी अर्थव्यवस्था) बद्दलच्या दीर्घकालीन कामाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या मानपत्रात लहान विकसनशील देशांना त्यांनी दिलेला पाठिंबा, हवामान लवचिकता, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि महासागराच्या संसाधनांचे जबाबदार व्यवस्थापन या बाबींचा गौरव करण्यात आला आहे. तसंच यातून भारत आणि सेशेल्समधील दृढ होत चाललेल्या भागीदारीवरही प्रकाश टाकण्यात आला आहे.
या बहुमानाबद्दल भावना व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटलं, “गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन पुरस्कार स्वीकारताना मला अत्यंत नम्र वाटत आहे. मी हा किताब आदराने स्वीकारतो आणि तो अशा सर्व देशांना समर्पित करतो जे हवामान बदलाच्या आव्हानांशी लढा देत आहेत आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी मानतात.”
हेही वाचा – ‘मी मोदीभक्त, उठसूट होणारे आरोपाला उत्तर देण्यात अर्थ नाही’; मंत्री चंद्रकांत पाटील
हवामान कृती, शाश्वत विकास आणि हरित विकासातील योगदानासाठी पंतप्रधान मोदींना मिळालेल्या जागतिक सन्मानांच्या मालिकेतील हा नवीनतम पुरस्कार आहे. मे २०२६मध्ये अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) त्यांना अन्न सुरक्षा बळकट करण्यासाठी, कृषी क्षेत्रात बदल घडवण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी ॲग्रिकोला मेडल (Agricola Medal) प्रदान केलं होतं. तर, २०१८ मध्ये शाश्वत आर्थिक विकास, जागतिक सहकार्य आणि सर्वसमावेशक विकासाला चालना दिल्याबद्दल त्यांना ‘सोल शांतता पुरस्कार’ (Seoul Peace Prize) मिळाला.
२०१८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी (UN) त्यांना हवामान कृती आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण सहकार्याला चालना देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाची दखल घेत चॅम्पियन्स ऑफ द अर्थ (Champions of the Earth Award) या संस्थेच्या सर्वोच्च पर्यावरण सन्मानाने गौरविलं. सेशेल्सकडून मिळालेला हा नवा बहुमान पंतप्रधान मोदींच्या आंतरराष्ट्रीय सन्मानांच्या वाढत्या यादीत भर घालणारा असून, पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हवामान कृतीसाठी त्यांच्या जागतिक स्तरावरील प्रयत्नांना अधोरेखित करतो.





