Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार शिक्षा!

पुणे | पुण्यातील भोर जवळील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या ६५ वर्षीय नराधमाला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी गुरुवारी (२५ जून) आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला या अत्यंत क्रूर गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. न्यायालयीन इतिहासात अत्यंत जलदगतीने या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून, दोषीला देण्यात येणारी शिक्षा २९ जून रोजी ठोठावली जाणार आहे.

१ मे २०२६ रोजी नसरापूर येथे ही काळीज हेलावून टाकणारी घटना घडली होती. आरोपी भीमराव कांबळे याने साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने नेले होते. प्राथमिक तपासात उघड झाल्याप्रमाणे, त्याने मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. एवढेच नव्हे तर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. या घटनेनंतर परिसरात तीव्र जनआक्रोश निर्माण झाला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे तात्काळ चक्र फिरवून आरोपी भीमराव कांबळे याला अटक केली होती.

हेही वाचा

संपादकीय : पिंपरी-चिंचवडच्या पाण्यासाठी आता आमदार महेश लांडगेच ‘‘आशेचा किरण’’!

“तो इतिहास झाला, आता गुन्हा सिद्ध झालाय!”

अंतिम सुनावणीदरम्यान विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपी भीमराव कांबळे याला थेट विचारणा केली की, “तुला कोणती शिक्षा द्यायची, फाशीची की जन्मठेपेची?” यावर नराधम कांबळे याने स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत कोर्टात खोटा बनाव रचला. तो म्हणाला, “मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. तिथे माझा पाय घसरला आणि मी पडलो, त्यामुळे त्या मुलीच्याही डोक्याला मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती सारखी ओरडत होती…” त्याच्या या विधानावर न्यायाधीशांनी त्याला कडक शब्दांत फटकारले. न्यायाधीश साळुंखे म्हणाले, “तू जे सांगत आहेस तो आता इतिहास झाला आहे, तुझ्यावरचा गुन्हा पूर्णपणे सिद्ध झाला आहे.” न्यायाधीशांच्या या रोकठोक वक्तव्यानंतर आरोपी निरुत्तर झाला.

२९ जून रोजी अंतिम निकाल

या संवेदनशील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा खटला जलदगती न्यायालयात (Fast Track Court) चालवण्यात आला आणि विक्रमी वेळेत सुनावणी पूर्ण करून आरोपीला दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने आरोपीला शिक्षा देण्याचा अंतिम निकाल सध्या राखून ठेवला असून, चार दिवसांनंतर म्हणजेच २९ जून २०२६ रोजी या नराधमाला नेमकी कोणती कडक शिक्षा दिली जाणार, हे स्पष्ट होईल. पीडितेच्या कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता २९ जूनच्या अंतिम निकालाकडे लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button