Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा

मुंबई : महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत वास्तव्यास असलेल्या पश्चिम बंगालच्या नागरिकांना राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी बंगाली गीत व नृत्याच्या माध्यमातून उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाला व विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.

केंद्र शासनाच्या एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत पश्चिम बंगालचा राज्य स्थापना दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला.

महाराष्ट्र व पश्चिम बंगाल परस्परांपासून दोन हजार किमी दूर असले तरी देखील दोन्ही राज्यांमधील लोकांची अस्मिता समान असल्याचे यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले.

हेही वाचा –  एमआयटी एसीएससीमध्ये ‘AI-Powered Academic Excellence’ दोन दिवसीय कार्यशाळा यशस्वी

दोन्ही राज्यांना इतिहास, संस्कृती, अध्यात्म व राष्ट्रवादाच्या जाणिवेने जोडले असून दोन्ही राज्यांनी गौरांग महाप्रभु, संत तुकाराम, अहिल्यादेवी होळकर, स्वामी विवेकानंद यांसारखे महान प्रभृती दिल्या असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात दोन्ही राज्यांनी देशाला नेतृत्व प्रदान केले. बंगालने सुभाषचंद्र बोस व बिपीन चंद्र पाल यांसारखे नेते दिले तर महाराष्ट्राने लोकमान्य टिळक, गोखले यांसह अनेक नेते दिले असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

बंगालप्रमाणेच महाराष्ट्र देखील साहित्य व संस्कृती प्रेमी राज्य असल्याचे आपण अनुभवले असल्याचे राज्यपालांनी सांगितले. बंगालने साहित्य – संगीत जगतात फार मोठे योगदान दिले असल्याचे राज्यपालांनी सांगितले. जो विचार बंगाल आज करतो तो विचार देश दुसऱ्या दिवशी करतो असे म्हटले जाते, असे सांगून बंगालच्या सुपुत्रांनी देशाला ‘वंदे मातरम’ व ‘जन गण मन’ ही दोन्ही राष्ट्रीय गीते दिली असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे तर कोलकाता ही सांस्कृतिक राजधानी असल्याचे राज्यपालांनी सांगितले. बंगाली भाषा सुमधुर असून रसगुल्ल्याप्रमाणे गोड असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी सोलापूर येथील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दुर्गा पूजेचे गीत ‘हे लो गिरी सून लो खोबोर’, पश्चिम बंगालच्या अजरामर व्यक्तिमत्वांची गाथा सांगणारे एकपात्री सादरीकरण, लोकनृत्य तसेच कथक नृत्य सादर केले.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालची सांस्कृतिक परंपरा दाखविणारा संगीत व नृत्याचा कार्यक्रम सादर केला.

कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, सांस्कृतिक समन्वयक, लोकभवनचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुंबईतील विविध शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button