भारतात ‘या’ १० उत्पन्नावर एक रुपयाही टॅक्स नाही! प्राप्तिकर परतावा भरण्यापूर्वी ‘हे’ नियम नक्की वाचा

tax free income sources india : प्राप्तिकर परतावा भरण्याची अंतिम मुदत वेगाने जवळ येत आहे. अनेकांचा असा गैरसमज असतो की आपण कमावलेल्या प्रत्येक रुपयावर सरकारला टॅक्स द्यावा लागतो. परंतु, भारतीय प्राप्तिकर कायद्यामध्ये काही अशा कायदेशीर तरतुदी आणि सवलती आहेत, ज्यांच्या अंतर्गत येणाऱ्या उत्पन्नावर तुम्हाला सरकारला एक रुपयाही कर द्यावा लागत नाही. शेतीपासून ते विम्याच्या रकमेपर्यंतच्या अशा १० करमुक्त उत्पन्नाच्या मार्गांची सविस्तर माहिती घेऊया.
शेतीतून मिळणारा नफा
भारत कृषिप्रधान देश असल्याने शेतीतून मिळणारे कोणतेही उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे. पण, शेती फक्त तुमच्या नावावर असून चालत नाही. तर तुमचे उत्पन्न हे प्रत्यक्ष शेतीकामातून किंवा शेतीशी संबंधित व्यवसायातून मिळालेले असावे. शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजे तुमची वार्षिक कमाई अगदी १ कोटी रूपये असली तरी तुम्हाला एकही रुपया कर भरावा लागत नाही.
कुटुंबाकडून मिळालेली मालमत्ता
आई-वडील किंवा जवळच्या नातेवाईकांकडून मृत्युपत्राद्वारे मिळालेले घर, जमीन किंवा रोख रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही. सध्या भारतात ‘वारसा कर’ लागू नाही. मात्र, भविष्यात तुम्ही ती मिळालेली मालमत्ता विकली, तर त्यावर कर लागू आहे.
सुकन्या समृद्धी योजना
मुलींच्या आर्थिक भविष्यासाठी सरकारने सुरू केलेल्या या योजनेत दीड लाखांच्या मर्यादेपर्यंत असलेल्या गुंतवणुकीवर कोणताही कर द्यावा लागत नाही. या खात्यात जमा होणाऱ्या पैशांवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारा एकूण निधी यावरही सरकार कोणताही कर वसूल करत नाही.
पीपीएफ (PPF) मधील गुंतवणूक
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच ‘पीपीएफ’ ही देखील सरकारच्या माध्यमातून चालवली जाणारी लोककल्याणकारी योजना आहे. या योजनेत जमा होणारे वार्षिक व्याज आणि १५ वर्षांच्या मुदतपूर्तीनंतर मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त असते. या योजनेतही एका वर्षात १,५०,००० रुपयांपर्यंत गुंतवणुकीवर कोणताही कर द्यावा लागत नाही.
ईपीएफ (EPF) मधून काढलेले पैसे
खासगी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर सर्वात मोठा आधार असलेल्या या योजनेतील गुंतवणुकीवरही विशेष सवलत देण्यात आली आहे. जर तुम्ही सलग ५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ नोकरी करून ईपीएफमधील पैसे काढले, तर त्यावर कर लागत नाही. मात्र, ५ वर्षांच्या आत पैसे काढल्यास नियम बदलू शकतात.
जीवन विम्याचा क्लेम (विमा रक्कम)
विमाधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मिळणारी विम्याची रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. प्राप्तिकर कायदा कलम १०(१०डी) अंतर्गत, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला मिळालेली संपूर्ण रक्कम करमुक्त असते.
जवळच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तू
लग्नात किंवा इतर प्रसंगी रक्ताच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या महागड्या भेटवस्तू किंवा रोख रकमेवर कर आकारला जात नाही. पण, मित्र किंवा इतर कोणी दिलेल्या मोठ्या रकमेच्या भेटींवर कर द्यावा लागू शकतो.
शैक्षणिक स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती)
भारताच्या आयकर कायद्याच्या कलम १०(१६) नुसार, शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मिळालेली कोणतीही शिष्यवृत्ती पूर्णपणे करमुक्त असते. ही रक्कम तुम्ही शिकवणी, वसतिगृह किंवा पुस्तकांसाठी वापरत असलात, तरी त्यावर कोणताही कर आकारला जात नाही.
नोकरी सोडताना मिळणारी ग्रॅच्युइटी
हा नियम तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता आणि ग्रॅच्युइटीची रक्कम किती आहे यावर अवलंबून आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी ग्रॅच्युइटीची संपूर्ण रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी २० लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त असते.
सरकारी मदत आणि विशेष भरपाई
विशिष्ट आपत्कालीन परिस्थितीत सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई सहसा करमुक्त असते. यावर कोणताही आयकर आकारला जात नाही.





