पुणे-सातारा महामार्गावरील प्रवास सुसाट अन् विनाअडथळा! ‘एनएचएआय’कडून आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित

पुणे : पावसाळ्यात महामार्गावर पाणी साचणे, दरडी कोसळणे यासह इतर अनेक आपत्कालीन घटना घडतात. यामुळे अपघात घडण्यासह मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांचे हाल होतात. आता यावर उपाययोजनांचे पाऊल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) उचलले आहे. प्राधिकरणाने पुणे ते सातारा महामार्गावर पावसाळापूर्व कामे पूर्ण करून आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केली आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील प्रवास अधिक सुरक्षित आणि विनाअडथळा होणार आहे.
पुणे ते सातारा महामार्ग १४१ किलोमीटर लांबीचा असून, तो सहापदरी आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. याचबरोबर दृश्यमानता कमी झाल्याने अपघात होण्याचा धोका वाढतो. हा धोका कमी करण्यासाठी महामार्गावर थर्मोप्लास्टिकने मार्गिका आखण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावरील मार्गिका प्रतिकूल हवामानातही स्पष्टपणे दिसू शकतील. महामार्गावर पावसाळापूर्व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. याचबरोबर सुरक्षात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला असून, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे, अशी माहिती प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे.
प्राधिकरणाने पुणे-सातारा महामार्गावर पावसाळापूर्व सर्वेक्षण केले आहे. त्यात सूचना फलक, क्रॅश बॅरियर, कठडे आणि डोंगर उतारांचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच, महामार्गावरील झाडांच्या धोकादायक फांद्याची छाटणी करण्यात आली आहे. महामार्गांच्या परिसरातील नाल्यांतील गाळ काढून त्यांची सफाई करण्यात आली आहे. पावसाचे पाणी विनाअडथळा वाहून जावे यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरडी कोसळणाऱ्या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. पावसाळ्यात रस्ता ओला होऊन निसरडा बनतो. त्यामुळे त्यावरून वाहने घसरून अपघात होतात. हे टाळण्यासाठी प्राधिकरणाने बिटुमिनियस काँक्रीटचा थर महामार्गावर मारला आहे. यामुळे महामार्गावर वाहने घसरण्याचा धोका कमी होणार आहे. याचबरोबर महामार्गाच्या कठड्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे, असे प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा
- रुग्णवाहिका – २०
- क्रेन – ५
- गस्त वाहने – ४
- अग्निशमन केंद्रे – १२
- रुग्णालये – ३४
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पावसाळ्यात महामार्गावर पाणी साचू नये, यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. महामार्गावर पाणी उपशासाठी पंप, जेसीबी यंत्रे, खोदकाम करणारी यंत्रे, रोड रोलर, जनित्रे आणि पाण्याचे टँकर यासह मनुष्यबळ तैनात केले आहे. याचबरोबर वाहनचालकांना सुरक्षेच्या सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत. पावसाळ्यात नागरिकांचा प्रवास अधिकाधिक सुरक्षित व्हावा, यासाठी जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.
– सुभाष घंटे, वरिष्ठ अभियंता,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण





