शेतकऱ्यांना दिलासा! जूनअखेर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज; १८ जूनपासून मुंबई-कोकणात वेग वाढणार

मुंबई : राज्यातील शेतकरी, नागरिक आणि प्रशासन सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लक्ष ठेवून आहेत. यंदा जून महिना अर्ध्यावर आला असला तरी राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनची अपेक्षित प्रगती झालेली दिसत नाही.
काही ठिकाणी पूर्वमोसमी सरी आणि वादळी पाऊस होत असला तरी व्यापक स्वरूपाचा मान्सून अद्याप सक्रिय झालेला नाही. त्यामुळे शेतीसह विविध क्षेत्रांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत मान्सूनचा वेग मंदावलेला आहे. विशेषत: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम असून नागरिकांना उष्णता आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये मान्सूनने पुढे सरकत पावसाची हजेरी लावली आहे. आसाम, मेघालय, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पावसाच्या हालचाली दिसून येत आहेत.
हेही वाचा – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा
महाराष्ट्रासाठी मात्र पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १८ जून ते २५ जून या कालावधीत मुंबई आणि कोकण किनारपट्टी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर २५ जून ते २ जुलै या आठवड्यात राज्यातील अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. २ जुलै ते ९ जुलै या कालावधीत पावसाचे प्रमाण पुन्हा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जूनअखेरीस जोरदार पाऊस झाल्यानंतर जुलैच्या सुरुवातीला काही भागांमध्ये पावसाचा खंड पडू शकतो.
दरम्यान, शनिवारी राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून येथे ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय नाशिक आणि वर्धा जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.





