अन्नभेसळीमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, जाणून घ्या यामागचे छुपे वास्तव

Food Adulteration : अन्न भेसळीमध्ये नफ्यासाठी अन्नामध्ये जी धोकादायक रसायने, रंग आणि निकृष्ट दर्जाचे पर्याय मिसळले जातात त्या विषारी भेसळयुक्त पदार्थांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने कर्करोग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.
अन्नपदार्थांमध्ये मुद्दामहून किंवा अनावधानाने निकृष्ट, विषारी किंवा निरुपयोगी घटक मिसळणे म्हणजे ‘अन्न भेसळ’ होय. भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या सेवनामुळे शरीरावर गंभीर दुष्परिणाम होतात. यातील काही तत्काळ असतात, तर काही दीर्घकालीन म्हणजे लगेच लक्षात न येण्यासारखे असतात. मळमळ, उलट्या, जुलाब, पोटात खूप दुखणे आणि गॅस्ट्रो यांसारखे तत्काळ त्रास होतात तर काही व्यक्तींना विषबाधा ( Food Poisoning ) होऊन जीव धोक्यात येऊ शकतो. दीर्घकालीन दुष्परिणामांमुळे अनेक अवयवांचे नुकसान होते. मूत्रपिंड (Kidney) आणि यकृत (Liver) निकामी होऊ शकतात. अनेक रसायने व रंग (उदा. शिसे क्रोमेट) कर्करोगकारक असतात. भेसळयुक्त दुधातील किंवा तेलातील वाईट कोलेस्टेरॉलमुळे रक्तदाब वाढून हार्ट ॲटॅक येण्याची शक्यता असते. मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम होऊन मानसिक आजार किंवा स्नायूंचा पक्षाघात होऊ शकतो.
अन्न भेसळीमध्ये नफ्यासाठी अन्नामध्ये जी धोकादायक रसायने, रंग आणि निकृष्ट दर्जाचे पर्याय मिसळले जातात त्या विषारी भेसळयुक्त पदार्थांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने कर्करोग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. विशेषतः यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि पचनसंस्थेचा कर्करोग यांचा यात समावेश होतो. भेसळयुक्त अन्नात असणारे अनेक घटक कर्करोगकारक असल्याचे ज्ञात आहे.
कॅन्सर होण्याची कारणे
अ) डीएनए उत्परिवर्तन – अन्न किंवा पाणी यामध्ये जेव्हा कर्करोगकारक घटक असतात, तेव्हा ते घटक निरोगी व्यक्तीच्या पेशींमधील डीएनएला नुकसान पोहोचवू शकतात, ज्यामुळे घातक ट्यूमरच्या वाढीस चालना मिळते. उत्परिवर्तन (Mutation) म्हणजे डीएनए (DNA)च्या क्रमामध्ये किंवा जनुकांमध्ये अचानक आणि कायमस्वरूपी होणारा बदल होय.
ब) ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस – रंग आणि जड धातूंमुळे शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होतात. यामुळे पेशींना सूज येते आणि उत्परिवर्तनाची शक्यता वाढते.
क) अवयवांवरील अतिरिक्त भार – यकृत आणि मूत्रपिंड हे अवयव शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे काम करत असतात. अन्नभेसळीमुळे या अवयवांवर ताण येतो आणि हे अवयव निकामी होतात. त्यामुळे विषारी पदार्थ शरीरात म्हणजे पेशींमध्ये साठून राहतात आणि कॅन्सरचा धोका वाढतो.
ड) अंतःस्रावी व्यत्यय, एपिजेनेटिक बदल किंवा दीर्घकालीन दाह याद्वारेही कर्करोग निर्माण होऊ शकतो. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित करायला हवे आणि विश्वासार्ह, प्रमाणित विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ खरेदी करायला हवेत.
कॅन्सरला कारणीभूत पदार्थ
१. मेटॅनिल यलो – हळद, मसाले आणि डाळी यामध्ये मेटॅनिल यलो ची भेसळ केली जाते. खाद्यपदार्थांचा रंग आणि प्रमाण वाढवणे तसेच ते चमकदार करण्यासाठी ही भेसळ केली जाते.
२. मॅलाकाईट ग्रीन – भाज्या हिरव्यागार आणि आकर्षक दिसण्यासाठी हा चमकदार कृत्रिम रंग वापरला जातो. यामुळे तीव्र विषबाधा होते आणि कर्करोगाचा धोका वाढतो.
३. कॅल्शियम कार्बाईड – फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी याचा वापर केला जातो. यामध्ये अनेकदा विषारी आर्सेनिक आणि फॉस्फरसचे अंश आढळतात, जे कॅन्सर निर्माण करू शकतात.
४. अफ्लाटॉक्झिन – धान्ये, सुका मेवा, मका हे पदार्थ साठवून ठेवल्यामुळे यांच्यावर बुरशी वाढते आणि त्यातून अफ्लाटॉक्झिन निर्माण होते. अल्फा टॉक्सिनमुळे तीव्र यकृत-विषबाधा होते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि यकृताचा कर्करोग होऊ शकतो. अफ्लाटॉक्झिनमुळे कावीळ होणे, मुलांमध्ये वाढ खुंटण्याची समस्या उद्भवू शकते. जागतिक पातळीवर यकृताच्या कर्करोगाचे (Cancer) एक प्रमुख कारण मानले जाते.
अफ्लाटॉक्झिन (Aflatoxin) हे ॲस्परजिलस (Aspergillus) नावाच्या बुरशीद्वारे तयार होणारे अत्यंत विषारी रसायन आहे. हे प्रामुख्याने शेंगदाणे, मका, गहू, तांदूळ, विविध तेलबिया आणि बदामासारख्या सुकामेवा यांसारख्या पिकांवर उष्ण व दमट वातावरणात वाढते. या खाद्यपदार्थांची योग्य साठवणूक न केल्याने (उदा. दमट किंवा सतत ढगाळ वातावरण) ही बुरशी अन्नधान्यात वाढते. जनावरांनी बुरशीयुक्त दूषित चारा किंवा पशुखाद्य खाल्ले, तर त्यांच्या दुधात अफ्लाटॉक्झिन उतरू शकते. नकळत भेसळ होऊ नये, यासाठी धान्य किंवा शेंगदाणे नेहमी कोरड्या आणि हवेशीर जागी साठवावे लागतात. खराब, बुरशी लागलेले धान्य कधीही खाऊ नये.
५. फॉरमॅलीन – मासे, मांस आणि दूध टिकवण्यासाठी कधीकधी बेकायदेशीरपणे फॉरमॅलीन वापरले जाते. फॉरमॅलीन हा माणसांमध्ये कॅन्सर निर्माण करतो, हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. घसा आणि रक्ताचा कॅन्सर हे यातले प्रमुख आहेत.





