To The Point: राज्यसभा निवडणूक। राष्ट्रवादीचे नेते खासदार पार्थ पवार यांचे ‘पॉलिटिकल बॅलन्स’
विधान परिषद, राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘चाणक्यनिती’

सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची संभाव्य नाराजी टाळण्याचा प्रयत्न
पुणे । विशेष प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये निर्णायक भूमिका घेणारे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पक्षातील जबाबदारी या मुद्यांवरुन नाराज आहेत, असा दावा सोशल मीडियासह राजकीय विश्लेषकांकडून केला जातो. त्यातच विधान परिषद आणि राज्यसभा उमेदवारी निश्चितीवरुन निष्ठावंत आणि दिग्गज नेत्यांना डावलले जात आहे, असा आरोप किंवा ‘नॅरेटिव्ह’ पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. वास्तविक खासदार पार्थ पवार यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने ‘पॉलिटिकल बॅलन्स’ साधले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली. याबाबतची घोषणा रविवार दि. ७ रोजी रात्री राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केली. २००४ ते २०१६ पर्यंत राजेंद्र जैन भंडारा – गोंदिया या मतदार संघातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विधानपरिषद आमदार होते.

हेही वाचा
भारताचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय! टीम इंडियाचा १ डाव अन् ३०० धावांनी ऐतिहासिक विजय
खासदार प्रफुल्ल पटेल यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात तसेच प्रफुल्ल पटेल यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले आहे. पूर्व विदर्भ आणि गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ते एक वजनदार नेते आहेत. “पक्षाने मला राज्यसभेवर जाण्याची जी संधी दिली ती फार गौरवाची गोष्ट असून छगन भुजबळ हे मला वडिलांसारखे आहेत. त्यांचा मला आशीर्वाद असून आमच्यातील नाराजीचा कुठेही प्रश्न नाही.” अशी प्रतिक्रिया राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांनी सोमवार दि.८ रोजी दिली. भंडारा – गोंदिया या पटेल यांचे वर्चस्व असलेल्या भागात राजेंद्र जैन यांनी राष्ट्रवादी पक्ष बळकटीचे काम केले आहे. तसेच गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पद सुद्धा त्यांनी जवळपास २५ वर्षे भूषविले असून गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले आहे.
तसेच, विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कोकणमध्ये राष्ट्रवादी सक्षम ठेवणे आणि तटकरेंना सोबत ठेवण्यात पार्थ पवार यशस्वी झाले आहेत. पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्वत: लक्ष पालकमंत्री आहेत. विदर्भात प्रफुल्ल पटेल यांच्या निकटवर्तीला संधी देत राष्ट्रवादीला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. झिशान सिद्धकी यांच्या माध्यमातून मुस्लिम व अल्पसंख्याक समाज आणि राजेंद्र जैन यांच्या माध्यमातून जैन समुदायात राष्ट्रवादीप्रती सकारात्मक संदेश देण्यात पार्थ पवार यशस्वी झालेले आहेत.
पटेल, तटकरे यांचा पक्षातील वरचष्मा कायम…
अवघ्या काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची यादी पाठवली होती. या यादीत सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख नसल्याने एकच गहजब झाला होता. तटकरे-पटेलांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याची आणि सुनेत्रा पवार या दोघांवर प्रचंड नाराज असल्याचे वृत्त तेव्हा पसरले होते. यानंतर काही दिवस सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘साईडलाईन’ करण्यात आल्याचेही सांगितले जात होते. पार्थ पवार आणि तटकरे-पटेल यांच्या प्रचंड अंतर्गत धुसफूस असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील तटकरे आणि पटेलांचे स्थान डळमळीत झाल्याची भीती व्यक्त करत अनेकांनी त्यांच्या भावी राजकीय कारकीर्दीबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र, त्याच सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी अवघ्या महिनाभरातच अनुक्रमे अनिकेत तटकरे आणि राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळवून देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही आपला वरचष्मा कायम असल्याचे दाखवून दिले आहे.





