भारताचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय! टीम इंडियाचा १ डाव अन् ३०० धावांनी ऐतिहासिक विजय

IND vs AFG Test | भारतीय क्रिकेट संघाने मुल्लनपूर येथे झालेल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध एकतर्फी आणि दणदणीत विजय मिळवला आहे. सोमवार, ८ जून रोजी सामन्याच्या अवघ्या तिसऱ्याच दिवशी भारताने पाहुण्या संघाचा एक डाव आणि ३०० धावांनी पराभव केला. भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील हा धावांच्या दृष्टीने सर्वात मोठा विजय ठरला आहे, तर जागतिक कसोटी क्रिकेटमधील हा १० वा सर्वात मोठा विजय आहे.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच सत्रात अफगाणिस्तानचा पहिला डाव अवघ्या १५२ धावांवर रोखला. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला ४१२ धावांची प्रचंड आघाडी मिळाल्याने कर्णधार शुभमन गिलने अफगाणिस्तानला ‘फॉलोऑन’ दिला. मात्र, दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानचा फलंदाजीचा क्रम पत्त्यांसारखा कोसळला आणि तिसरा दिवस संपण्यापूर्वीच ३५.५ षटकांत अवघ्या ११२ धावांवर त्यांचा दुसरा डाव आटोपला.
दुसऱ्या डावात अफगाणिस्तानकडून सलामीवीर सदिकुल्लाह अटलने (४२ धावा) चांगली सुरुवात केली होती, पण त्याला मोहम्मद सिराजने अब्दुल मलिकला (८) पायचीत करून पहिला धक्का दिला. त्यानंतर रेहमनुल्ला गुरबाजला (२४) कुलदीप यादवने बाद केले.
हेही वाचा
“मै कबड्डी का खिलाडी हू, शतरंज का खिलाडी नही हू”; राज्यसभेला डावलल्यानंतर छगन भुजबळांचे वक्तव्य
यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीसमोर अफगाणिस्तानची मधली फळी पूर्णपणे कोलमडली. सुंदरने रेहमत शाह (१३), कर्णधार हशमतुल्ला शाहदी (५), अझमतुल्ला ओमरझाई (४) आणि स्थिरावलेल्या सदिकुल्लाह अटलला बाद करत अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले. शेवटी कुलदीप यादवने नांगेयालिया खरोटे (६) आणि सलीम साफी (०) यांना बाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या डावात भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने ४, तर कुलदीप यादवने ३ विकेट्स घेतल्या.
पहिल्या डावात मानव सुतारचा ‘सिक्सर’
तत्पूर्वी, अफगाणिस्तानचा पहिला डाव १५२ धावांवर संपला होता. त्यांच्याकडून रेहमत शाहने (६०) सर्वाधिक झुंज दिली. मात्र, भारताच्या वतीने आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या मानव सुतारने अप्रतिम गोलंदाजी करत पहिल्या डावात ६ बळी घेतले. त्याला प्रसिद्ध कृष्णाने ३ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेत मोलाची साथ दिली.
शुभमन आणि केएल राहुलची शतके; भारताचा ५६४ धावांचा डोंगर
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ५६४ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला होता. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने १२६ धावांची आणि केएल राहुलने १०० धावांची शतकी खेळी केली. याशिवाय साई सुदर्शन आणि रिषभ पंत यांनी प्रत्येकी ८१ धावांचे योगदान दिले, तर वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५२ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून पहिल्या डावात सलीम साफीने ६ गडी बाद केले होते. मात्र, त्यांच्या फलंदाजांना दोन्ही डावांत भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही.





