प्रज्ञानंदचा ऐतिहासिक पराक्रम! प्रतिष्ठेची ‘नॉर्वे चेस’ स्पर्धा जिंकणारा ठरला पहिलाच भारतीय

Praggnanandhaa | भारताचा २० वर्षीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने बुद्धिबळ जगतात इतिहास रचला आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या ‘नॉर्वे चेस २०२६’ (Norway Chess) या सुपर-टूर्नामेंटचे जेतेपद पटकावण्याचा अभूतपूर्व पराक्रम प्रज्ञानंदने केला आहे. २०१३ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेच्या इतिहासात अजिंक्यपद मिळवणारा प्रज्ञानंद हा पहिलाच भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. त्याने भारताचे महान खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जगज्जेता डी. गुकेश यांनाही जे यश मिळवता आले नव्हते, ते अवघ्या २० व्या वर्षी मिळवून दाखवले.
स्पर्धेच्या सुरुवातीला प्रज्ञानंदची कामगिरी काहीशी निराशाजनक झाली होती आणि सहाव्या फेरीनंतर तो गुणतालिकेत थेट तळाला घसरला होता. मात्र, त्यानंतर त्याने स्पर्धेत जबरदस्त पुनरागमन केले. त्याने अखेरचे सलग चार सामने जिंकून थेट किताबाच्या शर्यतीत झेप घेतली.
अंतिम (दहाव्या) फेरीची सुरुवात त्याने १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावरून केली होती. जेतेपदासाठी त्याला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना प्रज्ञानंदने जर्मनीच्या विन्सेंट केमर याचा पराभव करत ३ पूर्ण गुण वसूल केले. या विजयासह त्याने एकूण १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे, आघाडीवर असलेल्या अमेरिकेच्या वेस्ली सो आणि अलिरेझा फिरुझा यांच्यातील पारंपरिक सामना बरोबरीत सुटल्याचा थेट फायदा प्रज्ञानंदला झाला आणि त्याचे विजेतेपद निश्चित झाले. वेस्ली सो १७ गुणांसह दुसऱ्या तर फिरुझा तिसऱ्या स्थानावर राहिले.
हेही वाचा
‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके अमेरिकेतून भारतात दाखल; दिल्लीत कडक सुरक्षा
मॅग्नस कार्लसनला दोनदा नमवले; गुकेशवरही मात
जेतेपदाच्या या ऐतिहासिक वाटचालीत प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि स्थानिक स्टार मॅग्नस कार्लसनला ‘क्लासिकल’ बुद्धिबळात तब्बल दोनदा पराभूत करण्याची अद्भूत किमया केली. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर कार्लसनला एकाच स्पर्धेत अशा प्रकारे पराभवाचे पाणी पाजणारा प्रज्ञानंद हा केवळ दुसराच भारतीय आहे.
तसेच, नवव्या फेरीत त्याने भारताचाच सहकारी आणि विद्यमान जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशचा अवघ्या ३४ चालींत पराभव करून आपले इरादे स्पष्ट केले होते. गुकेशविरुद्धच्या लढतीत त्याने संयम, चालींमधील अचूकता आणि वेळेचे उत्तम व्यवस्थापन याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
महिला विभागात बिबिसारा असाउबायेवा चॅम्पियन; भारतीयांची निराशा
महिला विभागात कझाकस्तानच्या बिबिसारा असाउबायेवा हिने अंतिम फेरीपूर्वीच आपले विजेतेपद निश्चित केले होते. शेवटच्या फेरीत तिला जगज्जेत्या ज्यू वेन्जूनकडून पराभव स्वीकारावा लागला असला, तरी तिचे अव्वल स्थान अबाधित राहिले. चीनची झू जिनेर दुसऱ्या स्थानावर राहिली.
महिला विभागात भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक ठरली. दिव्या देशमुखला चीनच्या झू जिनेरकडून पराभव पत्करावा लागला, तर भारताची आघाडीची खेळाडू कोनेरू हम्पी हिला ज्यू वेन्जूनकडून ‘आर्मागेडॉन’ (Armageddon) डावात पराभवाचा सामना करावा लागला.





