‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक धमाका! १०० कोटी कमावणारा पहिलाच मराठी सिनेमा

Raja Shivaji | प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व इतिहास रचला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या ऐतिहासिक चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक जुने रेकॉर्ड्स मोडीत काढले असून, आता हा चित्रपट केवळ भारतात १०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करणारा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.
चित्रपट प्रदर्शित होऊन २४ ते २५ दिवस उलटले असले, तरीही महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शोज अजूनही ‘हाउसफुल्ल’ सुरू आहेत. प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची क्रेझ कायम असून थिएटर्समध्ये गर्दी ओसंडून वाहत आहे.
अशी आहे बॉक्स ऑफिसवरील यशस्वी घोडदौड
‘राजा शिवाजी’ चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली होती. फक्त भारतात या चित्रपटाने तब्बल १०१.४० कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. यामध्ये पहिल्या आठवड्यात ₹५७.७० कोटी, दुसऱ्या आठवड्यात ₹२७.०० कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात ₹८.४० कोटींचा गल्ला जमवला आहे.
हेही वाचा
जगभरात १२० कोटींचा टप्पा पार
फक्त भारतातच नव्हे, तर परदेशात राहणाऱ्या मराठी आणि भारतीय प्रेक्षकांनीही या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. भारतात १०१.४० कोटींची कमाई करणाऱ्या या सिनेमाचे जगभरातील एकूण कलेक्शन (Worldwide Box Office Collection) आता १२० कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आजवर कोणत्याही चित्रपटाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळालेले नाही.
दरम्यान, ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं असून, याची निर्मिती जिनिलीया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशच्या दोन्ही मुलांनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. रियान आणि राहील या दोघांनीही सिनेमात बाळ शिवरायांची भूमिका साकारली आहे.





