Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

अभिनेत्री त्विषा शर्मा मृत्यू प्रकरणाचा तपास आता CBI कडे; मध्यप्रदेश सरकारची मोठी घोषणा

Actress Tvisha Sharma | मॉडेल आणि अभिनेत्री त्विषा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक मोठे वळण मिळाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला असून मध्यप्रदेश सरकारने गुरुवारी याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. त्विषाच्या कुटुंबीयांनी तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत स्थानिक पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

३३ वर्षीय अभिनेत्री त्विषा शर्माचा विवाह निवृत्त जिल्हा न्यायाधीश गिरीबाला सिंह यांचे सुपुत्र समर्थ सिंह यांच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या ६ महिन्यांच्या आत, १२ मे रोजी भोपाळमधील कटारा हिल्स भागातील सासरच्या घरी त्विषाचा संशयास्पद मृत्यू झाला. भोपाळ येथील ‘एम्स’ (AIIMS) रुग्णालयातील शवविच्छेदन (Postmortem) अहवालात त्विषाचा मृत्यू फाशी लागल्यामुळे श्वास गुदमरून झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, त्विषाच्या कुटुंबीयांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून, हुंड्यासाठी केलेली क्रूर हत्या असल्याचा थेट आरोप सासरच्यांवर केला आहे.

स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर कुटुंबीयांचे गंभीर आरोप

त्विषाच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच भोपाळ पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला होता. त्यांच्या आरोपानुसार, घटनेनंतर जवळपास दोन दिवस गुन्ह्याची जागा (Crime Scene) आरोपींच्याच ताब्यात होती, ज्यामुळे त्यांना पुरावे नष्ट करण्याची पूर्ण संधी मिळाली. आत्महत्येसाठी वापरलेले साहित्य आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात पोलिसांनी जाणीवपूर्वक दिरंगाई केली. या तपासावर अविश्वास दाखवत कुटुंबीयांनी ‘एम्स’ दिल्ली येथे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्याची मागणी करत न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते.

हेही वाचा

आमच्या आईला मारलं, तर आम्ही का बोलू नये? प्रसाद लाड यांच्यासमोर मनोज जरांगेंचा सरकारवर तीव्र संताप

दरम्यान, भोपाळचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण वाटत असल्याचे म्हटले असले, तरी सुरुवातीच्या तपासात पोलिसांकडून चुका झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. याप्रकरणी संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर पुरावे लीक झाल्याने खळबळ

हे प्रकरण सध्या मध्यप्रदेशातील सर्वात गाजलेल्या आणि संवेदनशील प्रकरणांपैकी एक बनले आहे. गेल्या काही दिवसांत या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स (CDR), व्हॉट्सॲप चॅट्स आणि ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर आणि न्यायालयात लीक झाल्यामुळे कायदेशीर लढाई अधिक तीव्र झाली होती.

सध्या या प्रकरणी कटारा हिल्स पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ८०(२), ८५, ३(५) अन्वये घरगुती हिंसाचार, छळ, हुंडाबळी आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. आता सीबीआय या मुख्य गुन्ह्यासोबतच याच्याशी संबंधित रचला गेलेला कट आणि इतर सह-गुन्ह्यांचाही कसून तपास करणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button