वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड; BCCI कडून तिरंगी मालिकेसाठी संघ जाहीर

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला अखेर भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. निवड समितीने जून २०२६ मध्ये श्रीलंकेत होणाऱ्या आगामी वन डे तिरंगी मालिकेसाठी भारत ‘अ’ संघ जाहीर केला असून, या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले आहे.
या तिरंगी मालिकेत यजमान श्रीलंका ‘अ’, भारत ‘अ’ आणि अफगाणिस्तान ‘अ’ हे तीन संघ सहभागी होणार आहेत. मर्यादित षटकांच्या या तिरंगी स्पर्धेनंतर भारत ‘अ’ संघ श्रीलंका ‘अ’ विरुद्ध दोन बहुदिवसीय सामने खेळणार आहे. या कसोटी-प्रकारच्या सामन्यांसाठीचा संघ नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये दमदार कामगिरी करत क्रिकेट जगताचे लक्ष वेधले आहे. त्याने या हंगामातील ११ सामन्यात १ शतक आणि २ अर्धशतकांसह ४४० धावा केल्या आहेत. एकूण १८ आयपीएल सामन्यांमध्ये त्याने ६९२ धावा केल्या असून, त्यात २ शतके समाविष्ट आहेत.
मागील एक-दोन वर्षांत वैभवने आपल्या आक्रमक आणि परिपक्व फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. विशेषतः १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये त्याने १७५ धावांची विश्वविक्रमी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळावे अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून जोर धरत होती. अखेर निवड समितीने ही मागणी पूर्ण केली आहे.
तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघ :
तिलक वर्मा ( कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रियान पराग ( उप कर्णधार), आयुष बडोनी, निशांत सिंधू, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग, कुमार कुशाग्रा, विपराज निगम, यश ठाकूर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज, अर्शद खान
तिरंगी मालिकेचे वेळापत्रक
९ जून २०२६ – भारत अ वि. श्रीलंका अ
११ जून २०२६ – भारत अ वि. अफगाणिस्तान अ
१३ जून २०२६ – अफगाणिस्तान अ वि. श्रीलंका अ
१५ जून २०२६ – भारत अ वि. श्रीलंका अ
१७ जून २०२६ – भारत अ वि. अफगाणिस्तान अ
१९ जून २०२६ – अफगाणिस्तान अ वि. श्रीलंका अ
२१ जून २०२६ – फायनल





