नाणार बॉक्साईट जनसुनावणीला स्थगिती; शेतकरी विरोधानंतर प्रशासनाचा निर्णय, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार आणि परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाला स्थानिक शेतकरी व आंबा बागायतदारांचा तीव्र विरोध कायम असून, या पार्श्वभूमीवर प्रस्तावित जनसुनावणी स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, राजापूरचे प्रभारी प्रांताधिकारी विश्वजीत गाताडे, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, नगरसेवक विजय खेडेकर यांच्यासह नाणार परिसरातील शेतकरी व आंबा बागायतदार उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री मंत्री सामंत यांनी सांगितले की, नाणार बॉक्साईट प्रकरणात स्थानिक नागरिकांची भूमिका हीच शासनाची भूमिका राहणार आहे. पंचायत समिती राजापूरनेही एकमताने जनसुनावणी रद्द करण्याचा ठराव मंजूर केला असून, आमदार किरण सामंत यांनीही त्यास पाठिंबा दर्शविला आहे. बहुतांश खातेदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी विरोध नोंदविल्याने प्रशासनाने जनसुनावणी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारची दहा हजार कोटींची बचत, ह्या आठवड्यात मार्च-एप्रिलचे अनुदान?
“लोकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या संमतीनेच कोणताही निर्णय व्हायला हवा. शंभर टक्के शेतकरी आणि बागायतदार विरोधात असताना केंद्र शासनाने असा प्रकल्प लादू नये,” असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यानंतर नागरिक, मुख्यमंत्री आणि संबंधित यंत्रणांशी पुन्हा चर्चा करून स्थानिकांचा विरोध शासनापुढे मांडला जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जीआय मानांकन प्राप्त हापूस आंबा उत्पादकांच्या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. कॅनिंग कंपन्यांकडून मिळणाऱ्या दराबाबत झालेल्या चर्चेनंतर ‘एक्झास्टीक कॅनिंग कंपनी’ने आंबा उत्पादकांना प्रतिकिलो ५० रुपये दर देण्यास मान्यता दिल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस या नावाखाली कर्नाटकातील आंब्याची विक्री होत असल्याच्या तक्रारींवरही बैठकीत चर्चा झाली. अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश सामंत यांनी दिले. या समितीत पोलीस उपअधीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे. संशयित आंबा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून ती सील करण्याचे अधिकार समितीला असतील. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आणि आत्मा प्रकल्प संचालक विजय बेतीवार उपस्थित होते.
सारथी संस्थेचे विभागीय कार्यालय रत्नागिरी येथे सुरू करण्याबाबतही सकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती डॉ. सामंत यांनी दिली. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली असून, प्रस्ताव शासनाकडे सकारात्मकरीत्या पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सारथीशी संलग्न विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुविधा सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





