राज्यातील या ‘जिल्ह्यांना’ पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’… उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळण्याचा अंदाज

मुंबई : राज्यातील काही भागांत पश्चिमी विक्षोभाच्या (वादळाच्या) प्रभावामुळे पावसाची नोंद होत आहे. तसेच राज्यातील बहुतांश भागात कोरडे हवामान असून कोकण प्रदेशातील जिल्ह्यांना उष्ण आणि दमट वातावरणाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने गुरुवारी राज्यातील काही जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता व्यक्त केली असून काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ तर काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे
राज्यात मागील काही दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात अनेक भागात पावसाळी हवामान होते त्यांनतर एप्रिलच्या दुसऱ्या आठ्वड्यापासून राज्यातील मराठवाडा, विदर्भ आदी भागात उष्णतेची लाटसदृश्य स्थिती होती. यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला होता. विदर्भातही सरासरी कमाल तापमानाहून ३ ते ४ अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद होत होती. यामुळे तापमानाचा पारा ४६ अशांवर पोहोचला होता. दरम्यान, मागील काई दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळाच्या प्रभावामुळे पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, हवामान विभागाने शनिवारपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
हेही वाचा – भारतातील विमान इंजिन निर्मिती क्षेत्रात आघाडी
हवामान विभागाने गुरुवारी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पावसाळी हवामानामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानातही काहीशी घट नोंदली जात आहे. दरम्यान, बुधवारीही विदर्भातील बहुतांश भागात कमाल तापमानात कशीही घट नोंदली गेली. यामुळे नागरिकांना तीव्र उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. पुढील तीन दिवसात राज्यातील कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे नागरिकांना पुन्हा उष्णतेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
विदर्भातील यवतमाळ, चंद्र्पूर, वर्धा, गडचिरोली, नागपूर आणि गोंदिया आदी जिल्ह्यांमध्ये गुरुवारी वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली असून या जिल्ह्यांना गुरुवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या दरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर शुक्रवारीही भंडारा, चंद्रपूरमी गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर आदी भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.





