कागदांच्या ढिगाऱ्यात लपलेलं सत्य..; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ने हादरणार संपूर्ण व्यवस्था?

The maharashtra files movie : शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष यावर आधारित ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा सामाजिक आशयाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित झाला असून यामुळे कथेविषयीची उत्सुकता वाढली आहे. ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट केवळ एका महिलेच्या संघर्षाची कथा नाही, तर तो संपूर्ण व्यवस्थेतील छुप्या कार्यपद्धतीचं वास्तव उघड करणारा आरसा आहे. सरकारी कर्मचारी आणि दलालांकडून जनतेची कशी दिशाभूल केली जाते, न्याय कसा लांबवला जातो आणि भ्रष्टाचार कसा बोकाळतो, हे या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे.
कागदाच्या ढिगाऱ्यांत लपलेलं सत्य जेव्हा बाहेर येतं, तेव्हा फक्त फाईल्स उघडत नाहीत तर संपूर्ण व्यवस्था हादरतं, याचं चित्रण चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या 29 मे पासून हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. निर्माते, दिग्दर्शक, लेखन, कथा, पटकथा अशी सर्व बाजूंनी चित्रपटाची धुरा संजीव कुमार राठोड यांनी सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि सह निर्माते म्हणून शालिनी राठोड यांनी बाजू सांभाळली आहे.
हेही वाचा – ‘पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी’ उभारण्यासाठी पुढाकार!
या चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सनी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे.
फाईल्स म्हटलं की विवेक अग्निहोत्री यांचे चित्रपट डोळ्यांसमोर येतात. याआधी ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘द बंगाल फाईल्स’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. या दोन्ही चित्रपटांमधून भीषण वास्तव दाखवण्यात आलं होतं. त्यावरून वाद झाला असला तरी थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता ‘द महाराष्ट्र फाईल्स’ म्हटल्यावर त्यातून कोणतं सत्य बाहेर पडेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्यवस्थेवर वास्तविकरित्या व्यक्त होणारा संवेदनशील चित्रपट.. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी या मोशन पोस्टरवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.





