ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पावसाळ्यापूर्वी हिंजवडीतील नालेसफाई, रस्ते दुरुस्तीला गती द्या!

महानगर आयुक्तांचे प्रशासनाला आदेश; आमदार शंकर मांडेकरांसह ‘आयटी’ परिसराची पाहणी

पुणे | माहिती तंत्रज्ञान नगरी (आयटी हब) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आणि लगतच्या गावांमध्ये पावसाळ्यात उद्भवणारी वाहतूक कोंडी व पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरात पावसाळ्यापूर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

स्थानिक आमदार शंकर मांडेकर आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह महानगर आयुक्तांनी शनिवारी (२५ एप्रिल) या भागाचा सविस्तर पाहणी दौरा केला. मुळशी तालुक्यातील हिंजवडी, माण, मारुंजी, भूगाव आणि पिरंगुट या पट्ट्यात पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था आणि अपूर्ण नालेसफाईमुळे नागरिकांना दरवर्षी मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर परिसरातील सर्व नैसर्गिक ओढे व नाले अतिक्रमणमुक्त करून त्यांच्या सफाईची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश महानगर आयुक्तांनी दिले. विशेषतः ‘नांदे चौक’ येथील पावसाळी जलवाहिन्यांचे (स्टॉर्म वॉटर ड्रेनेज) काम प्राधान्याने मार्गी लावण्यास त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

पवना धरणातून गाळ काढण्यास प्रारंभ

हिंजवडी आयटी पार्क आणि औद्योगिक वसाहतींमधील वाहनांची मोठी वर्दळ लक्षात घेता, मर्सिडीज शोरूम (राष्ट्रीय महामार्ग ४८) ते हिंजवडी फेज-१ या जोडरस्त्याचा विकास वेगाने करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच लक्ष्मी चौक, कोलते-पाटील रस्ता आणि नेरे-दत्तवाडी-जांबे येथील रस्त्यांचे रुंदीकरण व विकासाचा आढावा घेण्यात आला. ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘प्राईड रोड’च्या कामाची महानगर आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा आणि गतीबाबत समाधान व्यक्त केले.

पाहणी दौऱ्यादरम्यान हिंजवडी, माण, मारुंजी, म्हाळुंगे, नांदे, चांदे आणि जांबे या गावांतील स्थानिक लोकप्रतिनिधींनी महानगर आयुक्तांची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या. या सर्व तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्या तातडीने सोडविण्याची ग्वाही महानगर आयुक्तांनी दिली. या पाहणी दौऱ्यात भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, ‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, अधीक्षक अभियंता प्रशांत पाटील, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सहआयुक्त (प्रभारी) हिम्मत खराडे, कार्यकारी अभियंता वसंत नाईक, सहमहानगर नियोजनकार सोनाली आहेर, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा परिषद गटविकास अधिकारी सुधीर भागवत, उपअभियंता श्रीधर फणसे, पोलिस निरीक्षक नितीन अंभोरे, हिंजवडीचे ग्रामसेवक अमोल घोळवे, मुळशी तालुका पंचायत समितीचे सभापती मंदा शेळके, उपअभियंता अमित तिडके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

“पावसाळा सुरू होण्यापूर्वी आयटी पार्क आणि लगतच्या रहिवासी क्षेत्रांतील रस्ते, नाले आणि पावसाळी पाणी व्यवस्थापनाची कामे चोख असणे आवश्यक आहे. नागरिकांना पावसाळ्यात त्रास होऊ नये, यासाठी कामांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.”

– डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए. 

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button