ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

एमआयटी एसीएस महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम उत्साहात

मास्टरकार्डच्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

आळंदी | जागतिक सायबर सुरक्षा जनजागृती महिन्यानिमित्त आळंदी (देवाची) येथील एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्त) ८ ते १० ऑक्टोबर दरम्यान तीन दिवसीय सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थी कल्याण विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचा सायबरइंटेल क्लब आणि डिझाइन ॲनालिटिक्स अँड सायबर सिक्युरिटी (डीएसीएस) विभाग यांनी संयुक्तपणे या उपक्रमाचे आयोजन केले होते. ऑनलाइन सुरक्षितता, फिशिंगपासून बचाव आणि सायबर धोक्यांना आळा घालणे याविषयी महाविद्यालयात जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

पहिल्या दिवशी ‘सायबर गुन्हे जनजागृती : धोके ओळखा, डिजिटल संरक्षण मजबूत करा’ या विषयावर तज्ज्ञ सत्र झाले. मास्टरकार्डचे ग्लोबल हेड (एंटरप्राइज प्रोटेक्शन अँड रिजनल सिक्युरिटी) नील पार्कर आणि चीफ रिजनल सिक्युरिटी ऑफिसर व आयटी ऑडिट डायरेक्टर श्यामकुमार नायर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फिशिंगपासून बचाव, सुरक्षित पासवर्डचा वापर, एंटरप्राइज सुरक्षा आणि ऑनलाइन गोपनीयता याविषयी त्यांनी प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा प्रश्नमंजूषा घेण्यात आली.

हेही वाचा

अवध राजपूत संघाच्या सामाजिक कार्यासाठी हक्काची जागा द्या!

दुसऱ्या दिवशी सायबर सुरक्षेचा संदेश सर्जनशीलपणे पोहोचवण्यासाठी डिजिटल पोस्टर निर्मिती आणि सायबर जनजागृती रील स्पर्धा घेण्यात आली. तिसऱ्या दिवशी फसवणुकीच्या पद्धती उलगडणारी सोशल इंजिनिअरिंग रोल-प्ले सत्रे झाली. समारोप समारंभात विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व सहभागींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. सहयोगी अधिष्ठाता (विद्यार्थी कल्याण) डॉ. सुनील महाजन, डीएसीएस विभागप्रमुख डॉ. बरीन शेख आणि सायबरइंटेल क्लबच्या समन्वयक गुणा धोंडवड यांनी उपक्रमाचे नियोजन केले. विद्यार्थ्यांनी उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button